Man behind Metro announcements : लोकल ट्रेनप्रमाणेच मेट्रोनेही दररोज असंख्य प्रवासी प्रवास करतात. मग ते मुंबई असो किंवा दिल्ली. मेट्रोमध्ये अनेकदा आपल्याला अनेक सूचना ऐकू येतात. पण, या सूचना नक्की कोण देत असेल याबद्दल तुम्हाला माहिती आहे का? नाही… तर चला याचबद्दल जाणून घेऊ. तर माजी न्यूज अँकर आणि दिल्ली मेट्रोचा परिचित आवाज म्हणजे शम्मी नारंग.
त्यांनी एक्स (ट्विटर) वर एक व्हिडीओ शेअर केला, ज्यामध्ये ते नातवाला पहिल्यांदाच मेट्रोमध्ये घेऊन आले होते. प्लॅटफॉर्म आणि मेट्रोचा डबा पाहताना त्या चिमुकल्याचे डोळे या अनोळखी परिसराचा अंदाज घेण्याचा प्रयत्न करत होते. त्यानंतर त्याला आनंदाचा धक्का बसला, जेव्हा मेट्रोमधील उद्घोषणा अशा आवाजात ऐकू आली, जो त्याच्यासाठी आधीपासूनच परिचित होता.
व्हिडीओमध्ये शम्मी नारंग यांचा नातू आपल्या कुटुंबासोबत ‘येलो लाइन’वरील ट्रेनमध्ये बसलेला दिसत आहे. पार्श्वभूमीवर आजोबांचा परिचित आवाज ऐकू येत असताना नारंग यांनी आपल्या नातवाला कडेवर घेतले आहे. त्याचे आई-वडीलही त्याला आजोबांचा आवाज ओळखण्यास सांगताना दिसत आहेत. त्यामुळे अनोळखी ठिकाणी ‘आजोबांचा आवाज’ ऐकताना नातवाच्या चेहऱ्यावर उमटलेले कुतूहल आणि गोंधळ या व्हिडीओमध्ये स्पष्टपणे दिसून येतो. नारंग यांच्यासाठी हा क्षण केवळ साध्या मेट्रो प्रवासापेक्षा खूपच खास होता. त्यानंतर हा व्हिडीओ एका अतिशय गोड क्षणाने संपतो. यात नारंग स्वतःच ती परिचित उद्घोषणा”पुढचे स्टेशन सुलतानपूर” (Agla station Sultanpur) उद्घोषणा करताना दिसतात आणि त्यानंतर मेट्रोचा निरोप घेतात.
व्हिडीओ नक्की बघा…
सोशल मीडियावर व्हायरल होणारा हा व्हिडीओ @iamshamminarang या एक्स (ट्विटर) अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे. तसेच ‘मी कदाचित आयुष्यभर मेट्रोने प्रवास करणार नाही. पण, माझा आवाज एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे नक्कीच पोहोचत राहील, याचा मला खूप अभिमान आहे. माझ्यापासून माझ्या छोट्या नातवापर्यंत आणि कदाचित एक दिवस त्याच्या नातवंडांपर्यंतही हा आवाज पोहोचेल. आज आम्ही माझ्या नातवाला पहिल्यांदा मेट्रोमध्ये घेऊन गेलो. ट्रेनमध्ये त्याला आजोबांचा आवाज ऐकून आश्चर्यही वाटले आणि थोडा गोंधळही उडाला. कारण – तो आवाज त्याच्यासाठी ओळखीचा आहे. पण, तोच आजवर मेट्रोमध्ये ऐकण्याचा त्याचा हा पहिलाच अनुभव होता’ ; अशी कॅप्शन व्हिडीओला देण्यात आली आहे.
