Viral Video Birthday Celebration In Metro : मित्र कसा असावा याची बरीच उदाहरणे आपल्याजवळ आहेत. त्यातील एक म्हणजे त्याचं दुःख तुमच्या डोळ्यांत पाणी तर त्याचं सुख आणि तुमच्या चेहऱ्यावर हसू घेऊन येते. बेस्ट फ्रेंड नाही खरा मित्र तोच ज्याच्याकडे आपण आपलं प्रत्येक दुःख लॉकरमध्ये ठेवल्यासारखं सुरक्षित असतं आणि यश, आनंद सगळ्या जगाला सांगावा तितकं कमी वाटतं. सोशल मीडियावर अशाच दोन मित्रांचा व्हिडीओ व्हायरल होतो आहे, यामध्ये चक्क एका मित्राने त्याच्या लाडक्या मित्राचा वाढदिवस साजरा केला आहे.

नेहमीप्रमाणे मेट्रोत प्रवाशांची गर्दी असते. त्या गर्दीत जागेवरून उठून तो ‘माझ्या मित्राचा वाढदिवस आहे” असे सगळ्या प्रवाशांना सांगताना दिसतो आणि खाली बसतो. त्यानंतर सगळे प्रवाशी मिळून जोरात टाळ्या वाजवत “हॅप्पी बर्थडे” गाणं म्हणायला सुरुवात करतात. इथपर्यंत वाढदिवस थांबत नाही तर मित्र लाडक्या मित्रासाठी मेलोडी चॉकलेटचे पाकीट घेऊन येतो आणि दोन्ही मित्र मिळून प्रवाशांना चॉकलेट वाटताना दिसतात आणि इतर प्रवासी सुद्धा त्याला वाढदिवसाच्या शुभेच्छा देताना दिसतात.

आत्तापर्यंत मित्र-मैत्रिणींना तुम्ही अनेक प्रकारे वाढदिवसाचे सरप्राईज देताना पाहिले असेल. त्यामध्ये केक कापणे, २५ वाढदिवसाचे गिफ्ट देणे, मद्यपानाची पार्टी करणे आदींचा समावेश होतो. पण, या मित्राने मेट्रोत वाढदिवस साजरा करून त्याच्या खास मित्राला जबरदस्त सरप्राईज दिले आहे. अगदी शाळेत वाढदिवस साजरा करतात त्याचप्रमाणे सगळ्यांसमोर उभं राहून त्याचा वाढदिवस आहे असे सांगून संपूर्ण वर्गात त्याला चॉकलेट वाटण्यास सांगितले आणि मित्राच्या चेहऱ्यावर हसू आणले.

व्हिडीओ नक्की बघा…

सोशल मीडियावर व्हायरल होणारा हा व्हिडीओ @hr_hemant_15 या इन्स्टाग्राम अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे. नेटकरी व्हिडीओ पाहून “असा मित्र प्रत्येकाला भेटो”, “खूप मस्त सरप्राईज होतं”, “तो खूप नशीबवान आहे. कारण – त्याच्या आयुष्यात असा चांगला मित्र आहे”, “सेलिब्रेशन तुम्ही करताय पण कसंतरी मला होतंय”, “तुझ्यासारखा मित्र प्रत्येकाला भेटायला हवा” आदी कमेंट्स तर अनेक जण त्यांच्या मित्रांना टॅग करून तुझा वाढदिवस असा करून असा म्हणताना दिसत आहेत.