Viral Video Driver Falls Asleep In Car Middle Of Road : झोप ही आपल्या शरीरासाठी आणि मेंदूसाठी अत्यंत महत्त्वाची आहे. पुरेशी झोप न मिळाल्यास थकवा जाणवतो आणि त्याचा शारीरिक तसेच मानसिक आरोग्यावर परिणाम होऊ शकतो. मात्र, पुरेशी झोप घेण्याच्या नावाखाली कुठेही आणि कोणत्याही परिस्थितीत झोपणे योग्य नाही. केरळमध्ये एका व्यक्तीने असेच काहीसे केलं आणि स्वतःवर संकट ओढवून घेतले.

केरळमध्ये १९ ऑगस्ट २०२६ रोजी संध्याकाळी एका धक्कादायक आणि हास्यास्पद गोष्ट घडली. केरळमधील एट्टुमानूर–अथिराम्पुझा रस्त्यावर एका व्यक्तीने आपले वाहन चक्क रस्त्याच्या मधोमध उभे केले आणि गाडीतच झोपी गेला. रस्त्याच्या मधोमध गाडी उभी असल्याचे पाहून सुरुवातीला स्थानिकांना असे वाटले की, चालकाला काही आरोग्याची समस्या झाली असावी किंवा तो बेशुद्ध झाला असावा, त्यामुळे त्यांनी पोलिसांना माहिती दिली.

पण, पोलिस घटनास्थळी पोहोचल्यानंतर त्यांनी चालकाची तपासणी केली. त्यावेळी चालकाने मद्यपान केले असल्याचे आणि त्याच अवस्थेत तो गाडीत झोपल्याचे आढळून आले. त्यानंतर पोलिसांनी चालक आणि वाहन ताब्यात घेतले. या प्रकारामुळे काही काळ त्या परिसरात मोठी वाहतूक कोंडी झाली. व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता ती व्यक्ती कारमध्ये गाढ झोपलेली दिसते आहे आणि आपल्याभोवती जमलेल्या गर्दीची त्याला काहीच जाणीव नसते.

अनेक स्थानिक लोकांनी गाडीला वेढा घातला होता. खिडकीतून आत डोकावून बघत व्यक्तीचे लक्ष वेधून घेण्याचा प्रयत्न करत होते. काहीजण कारला टेकून त्याला हाका मारत होते, तर काहीजण त्याला उठवण्याच्या करण्याच्या उद्देशाने गाडीला बाजूने ढकलण्याचा किंवा हलवण्याचा प्रयत्न सुद्धा करत होते. चालकाला नक्की काय झाले आहे, हे समजून घेण्याचा प्रयत्न करताना तिथे बरीच खळबळ उडाली. वर्दळीच्या रस्त्यावर कार तशीच सोडून दिल्याने, ती व्यक्ती बेशुद्ध पडली असावी किंवा तिला काही वैद्यकीय समस्या उद्भवली असावी, असा संशय सुरुवातीला काही स्थानिकांना आला होता, मात्र सत्य काहीतरी वेगळंच निघालं.

व्हिडीओ नक्की बघा…

सोशल मीडियावर व्हायरल होणारा हा व्हिडीओ @jinx_5182 या एक्स (ट्विटर) अकाउंटवरून शेअर करण्यात आला होता. या विचित्र घटनेमुळे ऑनलाइन चिंता आणि टीका करणाऱ्या संमिश्र प्रतिक्रिया दिसल्या. काहींनी याकडे सकारात्मक दृष्टीने पाहिले की, मद्यपान करून गाडी चालवण्याचा प्रयत्न करण्याऐवजी त्या व्यक्तीने किमान गाडी थांबवली तरी होती; तर इतरांनी प्रश्न उपस्थित केला की, वर्दळीच्या रस्त्याच्या मधोमध गाडी सोडून देणे ही सुरक्षित बाब कशी असू शकते. तर एकाने म्हंटले की, गाडी पार्क करून झोपल्यामुळे कदाचित अधिक धोकादायक परिस्थिती टळली असावी, तर दुसऱ्या एका व्यक्तीने रस्त्यावरील इतरांच्या सुरक्षिततेच्या धोक्यांवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले; आदी अनेकविध कमेंट्स नेटकरी व्हिडीओखाली करताना दिसून आले आहेत.