man finds resume inside Blinkit order viral video : उन्हाळा, पावसाळा असो किंवा हिवाळा छोटं-मोठं सामान जरी आणायचं असेल तर सध्या आपण सगळेच फ्लिपकार्ट, झेप्टो किंवा ब्लिंकइटवरून सामान मागवतो. अनेकदा या ऑर्डरबरोबर आपल्याला किराणा सामान, स्नॅक्स किंवा घरगुती गरजेच्या वस्तू फ्रीमध्ये किंवा अगदी व्हाउचर सुद्धा दिले जातात. मात्र, दिल्लीतील एका व्यक्तीला अनोखी गोष्ट अनुभवायला मिळाली आहे. त्याच्या घरी पोहचलेल्या ऑर्डरबरोबर पाकिटात काहीतरी आश्चर्यकारक होते

दिल्लीतील क्रिएटिव्ह डायरेक्टर अंकित बावा यांनी त्यांच्या किराणा सामानाबरोबर आलेल्या एका अनोख्या गोष्टीचा व्हिडीओ इन्स्टाग्रामवर शेअर केला. ऑर्डर उघडताना त्यांना एका पाकिटात रेझ्युमे सापडला. सुरुवातीला ते पाकीट चुकून आले असावे असे वाटले. पण, ते मुद्दाम पाठवण्यात आल्याचे नंतर स्पष्ट झाले. त्या पाकिटावर, “कृपया चांगले कर्म (पुण्य) मिळवण्यासाठी हे वाचा – सुषिला,” असा संदेश लिहिलेला होता.

अंकित बावा यांना सुरुवातीला वाटले की, त्या पाकिटात नोकरी शोधणाऱ्या सुषिला यांचा रेझ्युमे असेल. पाकीट उघडल्यानंतर त्यांचा अंदाज खरा ठरला. मात्र, हा नेहमीसारखा रेझ्युमे नव्हता. त्या रेझ्युमेमध्ये सुषिला यांची ओळख, त्यांची कौशल्ये, कामाचा अनुभव अतिशय हुशारीने मांडण्यात आला होता. घरकामासाठी मदतनीस शोधणाऱ्या कुटुंबांना महत्त्वाच्या वाटणाऱ्या गुणांवर भर देण्यात आला होता. त्यात त्यांची विश्वासार्हता, कामातील कौशल्ये आणि घर व्यवस्थित सांभाळण्याची क्षमता आकर्षक पद्धतीने दाखवण्यात आली होती. त्यामुळे पहिल्या नजरेत तो खऱ्या नोकरीच्या अर्जासारखाच वाटत होता. पण, व्हिडीओ पुढे गेल्यावर या रेझ्युमेमागचा खरा हेतू समोर आला. हा रेझ्युमे प्रत्यक्षात ‘इंस्टाहेल्प’ या सेवेच्या जाहिरात मोहिमेचा भाग होता. अर्बन कंपनीकडून दिली जाणारी ही सेवा लोकांना घरगुती मदतनीस आणि कामगार शोधण्यास व नियुक्त करण्यास मदत करते असे स्पष्ट झाले.

व्हिडीओ नक्की बघा…

रेझ्युमे नाही इंस्टाहेल्पची जाहिरात (Viral Video )

पारंपरिक जाहिराती करण्याऐवजी या मोहिमेत लोकांच्या कुतूहलाचा वापर करण्यात आला. ब्लिंकइटच्या ऑर्डरमध्ये वैयक्तिक रेझ्युमेसारखे दिसणारे पाकीट ठेवून ग्राहकांना ते उघडून पाहण्यास आणि त्यातील संदेश वाचण्यास प्रवृत्त करण्यात आले. या वेगळ्या जाहिरात पद्धतीने सोशल मीडियावर अनेकांचे लक्ष वेधून घेतले. अनेकांनी या कल्पनेचे कौतुक केले. काहींनी तर म्हंटले की, ही जाहिरात आहे हे समजण्यापूर्वी त्यांनाही एखादी व्यक्ती खरोखर नोकरी शोधत आहे असेच वाटले होते. आजच्या काळात अनेक डिजिटल जाहिराती लोक सहजपणे स्क्रोल करून पुढे जातात. मात्र, या मोहिमेने लोकांना थांबायला, पाकीट उघडून पाहायला आणि त्याकडे लक्ष द्यायला भाग पाडले. सोशल मीडियावरील प्रतिक्रियांवरून ही युक्ती अपेक्षेप्रमाणे यशस्वी ठरल्याचे दिसून येते. सोशल मीडियावर व्हायरल होणारा हा व्हिडीओ @bawakahandle या इन्स्टाग्राम अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे.