Viral Video man secretly clicking women pictures : मुंबईत आपण कुठेही निर्धास्तपणे फिरू शकतो, मुली कुठेही जाऊ शकतात. कसलीही भीती नाही, असा दावा वारंवार केला जातो. पण, महिला खरंच सुरक्षित आहेत का, असा प्रश्न आजही अनेकदा वेगवेगळ्या प्रसंगातून आपल्यासमोर येऊन उभा राहतो. कोणी मुद्दाम धक्का मारतं, तर कोणी गर्दीचा गैरफायदा घेत इथे-तिथे हात लावून जातं. मुंबईतील मरीन ड्राइव्ह येथेसुद्धा अशीच एक घटना घडली आहे, ज्याने सगळ्यांनाच विचार करायला पुन्हा एकदा भाग पाडलं आहे.
एका वाटसरूने, अनोळखी पुरुषाला महिला आणि तिच्या मैत्रिणीचे फोटो आणि व्हिडीओ काढताना पहिले. त्याने बघताच त्या दोघींना याबद्दल कल्पना दिली. त्यानंतर महिलेने सार्वजनिक ठिकाणीच त्याच्याकडे जाऊन त्याचा फोन तपासला. तेव्हा त्यांचा फोटो आणि व्हिडीओ त्या पुरुषाच्या मोबाईलमध्ये आढळले. लगेचच तिने “हे फोटो का काढले. तुम्ही आमच्या वडिलांच्या वयाचे आहात, तरीही तुम्ही अशा गोष्टी का करता? तुम्ही माझा फोटो मागून का काढला?” ; असा जाब विचारण्यास सुरुवात केली.
मुलींकडे ‘कलेक्शनसाठीच्या वस्तू’ सारखं बघतात (Viral Video)
या प्रश्नांवर उत्तर देताना सुरुवातीला त्या माणसाने फोटो ‘साधे / कॅज्युअल’ आहेत, असे सांगितले आणि मग माफी मागत “सॉरी, मी पुन्हा असं करणार नाही”, असं म्हटलं. पण, त्या महिलेनं त्याला पुन्हा प्रश्न विचारले, “तुम्हाला अनोळखी लोकांचे फोटो काढायला परवानगी कोणी दिली? तुम्ही व्हिडीओ पण रेकॉर्ड केले का”, असे सगळे प्रश्न विचारल्यानंतर तिनं त्याला काढलेले फोटो डिलीट करण्यास सांगितले.
व्हिडीओ पाहण्यासाठी फोटोवर क्लिक करा…

सोशल मीडियावर व्हायरल होणारा हा व्हिडीओ @themrunalshelke या इन्स्टाग्राम अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे. तसेच कॅप्शनमध्ये स्वतः पुरावे पाहिल्यानंतर त्या पुरुषाला जाब विचारला. मी माझ्या वडिलांच्या वयाच्या एका पुरुषाला गुप्तपणे माझे फोटो आणि व्हिडीओ काढताना पकडले, एका दयाळू अनोळखी व्यक्तीने मला सावध केले. त्यामुळे मी त्याचा सामना करू शकले आणि पुरावे पाहू शकले. महिलांना गर्दीच्या सार्वजनिक ठिकाणीसुद्धा सतत सावध राहावं लागतंय. खूप वाईट वाटतं की, सार्वजनिक ठिकाणीसुद्धा काही लोक आपल्याकडे एखाद्या ‘कलेक्शनसाठीच्या वस्तू’सारखं बघतात,”, अशी कॅप्शन व्हिडीओला देण्यात आली आहे.
