हैदाबादमध्ये एक विचित्र घटना घडली आहे. येथील एका ४५ वर्षीय दुचाकीस्वाराला पोलिसांनी दंड ठोठावल्याने त्याने स्वत:चीच दुचाकी पोलिसांसमोर जाळून टाकली. सोमवारी ३ तारखेला हा प्रकार अमरपेठ मेट्रो स्थानकाजवळ घडला. हैदराबाद शहर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार ही व्यक्ती विरुद्ध बाजूने गाडी चालवत होती. यावेळी पोलिसांनी त्याचं चलान कापलं. मात्र संतापलेल्या या व्यक्तीने रस्त्यावरच आपल्या गाडीला आग लावली. रस्त्याच्या मध्यभागी जळणाऱ्या बाईकचा व्हिडीओ सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरत आहे. हा व्हिडीओ सध्या प्रचंड व्हायरल झाला असून अनेकांनी स्वत:चं नुकसान करुन घेणाऱ्या या व्यक्तीला वेड्यात काढलं आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

व्हायरल व्हिडीओमध्ये ही दुचाकी रस्त्याच्या मध्यभागी डबल स्टॅण्डवर उभी असून जळत असल्याचं दिसत आहे. येणाऱ्या जाणाऱ्या व्यक्ती आश्चर्याने हा सारा प्रकार पाहत आहेत. हा सर्व प्रकार माथ्रीवनम चौकात घडला. यामुळे इथं काहीकाळ वाहतूक कोंडीही झाली होती. वाहतूक पोलिसांचे सह पोलीस आयुक्त ए. व्ही. रंगनाथन यांनी हा सारा प्रकार तीन तारखेला घडल्याच्या वृत्ताला दुजोरा दिला आहे. आता हा व्हिडीओ व्हायरल होत असल्याचं त्यांनी सांगितलं.

आपल्याच दुचाकीला आग लावगणाऱ्या या व्यक्तीचं नाव एस. अशोक असं आहे. अशोक हा विरुद्ध बाजूने गाडी चालवत असताना वाहतूक पोलिसांनी त्यांना अडवलं. त्याच्याविरोधात पावती फाडण्यासाठी पोलीस नाव आणि इतर माहिती घेत असताना तो पोलिसांसोबत वाद घालत होता. पोलिसांनी अशोकला अनेकदा चुकीच्या बाजूने गाडी चालवताना पकडल्याचा दावा केला. आपल्याविरोधात होत असणारी कारवाई अशोकला पटली नाही. त्याने जवळच असणाऱ्या त्याच्या दुकानामधून एक पेट्रोलची बाटली आणली आणि ती गाडीवरुन ओतून गाडी पेटवून दिली.

असाच प्रकार मागील वर्षी उत्तर प्रदेशमध्येही घडला होता. दुचाकीवर पुढे आणि मागे बसणाऱ्या दोघांनाही हेल्मेट घालण्याच्या मुद्द्यावरुन पोलिसांनी थांबवल्यानंतर वाद झाल्याने एका व्यक्तीने स्वत:ची दुचाकी पोलिसांसमोर पेटवून दिली होती.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Viral video man sets bike on fire after being fined for traffic violation scsg
First published on: 07-10-2022 at 13:44 IST