Train Passenger Viral Video : घरातून निघाल्यापासून ते अगदी पिकनिकला पोहचेपर्यंत आपला प्रवास कसा होता, आपण कुठे, थांबलो काय केलं हे सगळं व्हिडीओद्वारे इतरांना सांगण्यात काही जण उत्सुक असतात. पण, हे करताना ट्रेनमध्ये रीलसाठी डान्स करणे, मोठमोठ्याने आरडाओरडा करून खेळ खेळणे अशा गोष्टी करून आपण सार्वजनिक ठिकाणी आहोत याचे भान काही लोक विसरून जातात. तर आज यासंबंधित एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. त्यामध्ये प्रवाशांच्या गैरवर्तणुकीचा व्हिडीओ नकळत शूट करण्यात आला आहे.
इन्स्टाग्राम युजर मनमोहन वर्मा बिलासपूर ते लखनऊ असा गरीब रथ एक्स्प्रेसने प्रवास करीत होते. या प्रवाशाला फक्त गंतव्य स्थान (डेस्टिनेशन)बद्दलचाच नाही, तर प्रवास करणाऱ्या माणसांबद्दलचा अनुभवही खूप काही शिकवून गेला. त्यांचा हा प्रवास शांत आणि आरामदायी होता. तो हळूहळू एखाद्या ‘लाइव्ह रिॲलिटी शो’सारखा गोंधळाचा व नाट्यमय झाला आणि तिथून त्यांची खरी परीक्षा सुरू झाली.
इतर प्रवासी शांतपणे प्रवास करण्याचा प्रयत्न करत असताना, डब्यातील जास्त संख्येत असणाऱ्या एका मोठ्या कुटुंबाने मोठ्याने संगीत वाजवणे, ओरडणे, रील्स शूट करणे सुरू केले. ट्रेनमधील कोच जणू त्यांना त्यांचा वैयक्तिक स्टुडिओ वाटला आणि त्यांनी इतर प्रवाशांचा विचारसुद्धा केला नाही. त्या कुटुंबातील काही सदस्य मोबाईलमध्ये व्हिडीओ शूट करत होते आणि काही सदस्य चादर घेऊन डान्स करीत होते. हे सगळं अगदी तासभर बघून वैतागलेल्या प्रवाशानं शेवटी १३९ या क्रमांकावर फोन करून तक्रार केली.
व्हिडीओ नक्की बघा…
रेल्वे पोलिसांनी लगेच प्रतिसाद दिला आणि परिस्थिती नियंत्रणात आणली. सोशल मीडियावर व्हायरल होणारा हा व्हिडीओ @bioeducator_manmohan या इन्स्टाग्राम अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे. नेटकरी हा व्हिडीओ पाहून संमिश्र प्रतिक्रिया देताना दिसत आहेत. काही जण आम्हालासुद्धा असे अनुभव अनेकदा आले आहेत, असं म्हणताना दिसत आहेत; तर काही जण प्रवास करताना लोकांनी कसे वागायला हवे याबद्दल आपली मते मांडत आहेत. तर काही जण तूसुद्धा कुटुंबाबरोबर प्रवास करत असतास, तर असंच काहीसं केलं असतंस, असे कमेंट्समध्ये म्हणताना दिसत आहेत.
