viral video mother dance for daughter and son in law : लेक सासरी जाणार ही भावनाच आई-वडिलांसाठी खूप जास्त कठीण असते. बाबांची लेक लाडकी असली तरीही आईनेही तिला फुलासारखे जपलेले असते, त्यामुळे लहानाचं मोठं केलेल्या नाजूक फुलाला दुसऱ्यांच्या घरी पाठवताना त्यांच्या मनाची घालमेल सुरू असते. एकीकडे तिच्या लग्नाचा आनंद तर दुसरीकडे ती आपल्याला सोडून जाणार याचे दुःख असते. तर आज सोशल मीडियावर असाच एक व्हिडीओ व्हायरल होतो आहे, ज्यामध्ये आईने लग्न ठरलेल्या लेकीसाठी सुंदर डान्स केलेला दिसतो आहे.
@_sumati_015 आईने आपल्या लेकीच्या साखरपुड्यात खूप सुंदर डान्सचे सादरीकरण केले. पण, या डान्समध्ये फक्त स्टेप्स नसून तिने तिच्या भावना हावभावाद्वारे मांडल्या आहेत. ‘हम आपके हैं कौन’ चित्रपटातील समधी समधन (आज हमारे दिल में) हे गाणं आई लेक आणि जावयासाठी सादर करताना दिसते आहे. ‘मेरी छाया है जो, आपके घर चली’ असे गाण्याचे बोल सुरू होतात आणि आई पदर खांद्यावर घेऊन जावई आणि लेकीसाठी गाणं गायला सुरुवात करते; तर तिला आधार देण्यासाठी कुटुंबातील दोघी जणी त्या माऊलीच्या मागे उभ्या राहून स्टेप्स करून ते गाणं हुबेहूब प्रदर्शित करताना दिसू लागतात.
“लेक खूप नशीबवान आहे” (Viral Video)
“राज़ की बात बतायें, राज़ की बात बतायें, ये पूँजी जीवन की…शोभा आज से हैं ये आपके आँगन की” जेव्हा गाण्याची ही ओळ येते, तेव्हा आई डोक्यावर पदर घेऊन जावयाकडे जाते आणि हात जोडून तिचा सांभाळ कर असं नकळत म्हणते. तेव्हा जावईसुद्धा मान राखून त्यांच्यापुढे हात जोडतो आणि जमलेल्या सगळ्यांना अश्रू अनावर होतात, तर काही जण आईने केलेल्या अनोख्या डान्सचे टाळ्या वाजवून कौतुक करताना दिसतात. एकदा बघाच आईने जावई आणि लेकीसाठी केलेला सुंदर डान्स…
व्हिडीओ नक्की बघा…
सोशल मीडियावर व्हायरल होणारा हा व्हिडीओ @_sumati_015 या इन्स्टाग्राम अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे. तसेच “माझ्या आयुष्यातला आनंदाचा क्षण म्हणजे माझ्या फुलपाखराचा साखरपुडा”; अशी कॅप्शन आईने व्हिडीओला दिली आहे.
नेटकरीसुद्धा व्हिडीओ पाहून भावूक झाले आहेत आणि “खूपच छान, माझी मुलगी तर अजून ७ वर्षांची आहे तरी हे पाहून डोळे पाणावले”, “संस्कारात राहूनपण आनंद साजरा करता येतो, आज हे या आईने सिद्ध करून दाखवले”, “लेक खूप नशीबवान आहे”, “एका आईसाठी सर्वात कठीण असते हे. कोणाच्या लेकराचे हे क्षण पाहिले की समोर स्वतःचे लेकरू दिसते”, “आपल्या काळजाचा तुकडा दुसऱ्याच्या स्वाधीन करायलापण खूप मोठं काळीज लागतं यार” आदी अनेकविध कमेंट्स नेटकऱ्यांनी व्हिडीओखाली केलेल्या दिसून आल्या आहेत.
