Mumbai Rickshaw Driver Earnings: देशाची आर्थिक राजधानी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मुंबईतून सध्या एक व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड वेगाने व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये एका तरुणाचा आणि एका रिक्षाचालकाचा झालेला साधासा वार्तालाप अनेकांना विचार करायला भाग पाडत आहे. कारण- या संभाषणात रिक्षाचालकाने सांगितलेली त्याची रोजची कमाई ऐकून अनेक जण अक्षरशः चकित झाले आहेत.

व्हिडीओमध्ये दिसणारा तरुण रिक्षामध्ये बसल्यानंतर चालकासोबत गप्पा मारू लागतो. मुंबईसारख्या महागड्या शहरात रोजचा खर्च कसा भागवता, असा प्रश्न तो रिक्षाचालकाला विचारतो. त्यावर रिक्षाचालक शांतपणे उत्तर देतो, “मुंबईमध्ये खर्च जरी जास्त असला तरी येथे कमाईच्या संधीही तितक्याच मोठ्या आहेत. येथे पैसा आहे, फक्त तो कमावण्याची तयारी असली पाहिजे.”

त्यानंतर चालकाने केलेला दावा ऐकून त्या तरुणाला अक्षरशः धक्का बसतो. रिक्षाचालक सांगतो की, तो दररोज सरासरी सुमारे २,५०० रुपये कमावतो अन् तेही सर्व खर्च वजा केल्यानंतर. म्हणजेच दिवसभर रिक्षा चालवून मिळणाऱ्या कमाईतून इंधन, इतर खर्च काढल्यानंतर त्याच्याकडे एवढी रक्कम उरते.

हे ऐकताच त्या तरुणाने पटकन गणित मांडले. जर दररोज २,५०० रुपये मिळत असतील, तर महिन्याला जवळपास ७५ हजार रुपयांपर्यंत उत्पन्न होऊ शकते. त्यावर तो थोड्या विनोदी अंदाजात म्हणतो, “कॉर्पोरेट ऑफिसमध्ये बसून काम करण्यापेक्षा ऑटो चालवणेच कदाचित जास्त फायद्याचे ठरेल. किमान रोज वेगवेगळ्या लोकांना भेटायला तरी मिळते.”

या व्हिडीओमध्ये आणखी एक मजकूर दिसतो, ज्यामुळे सोशल मीडियावर मोठी चर्चा सुरू झाली आहे. त्या मजकुरात लिहिले आहे, “भारतात ३० हजार रुपयांची नोकरी सन्मानजनक मानली जाते; मात्र ७५ हजार रुपये कमावणाऱ्या ऑटोचालकाला तितका मान मिळत नाही.” या वाक्यामुळे अनेकांनी समाजातील ‘यश’ मोजण्याच्या निकषांवर प्रश्न उपस्थित केले आहेत.

व्हिडीओ व्हायरल होताच नेटिझन्सनी विविध प्रतिक्रिया देण्यास सुरुवात केली. एका वापरकर्त्याने विनोदी टिप्पणी करत विचारले, “भाऊ, तुमच्या टीममध्ये एखादी जागा रिकामी आहे का?” तर दुसऱ्या एका व्यक्तीने लिहिले, “आई… मला ऑटोचालक व्हायचं आहे!” काही लोकांनी मात्र वास्तव मांडत सांगितले की, मोठ्या शहरांमध्ये अनेक ऑटोचालक खरोखरच चांगली कमाई करू शकतात.

तथापि, अनेकांनी या चर्चेकडे दुसऱ्या दृष्टिकोनातूनही पाहण्याचा प्रयत्न केला. काही वापरकर्त्यांनी सांगितले की, केवळ उत्पन्न जास्त असणे म्हणजे सर्व काही मिळाले, असे होत नाही. रिक्षाचालकाला दिवसभर रस्त्यावर राहावे लागते, प्रचंड वाहतूक, उन्हाळा, पाऊस आणि प्रदूषणाचा सामना करावा लागतो. त्याउलट कमी पगाराच्या नोकरीत निश्चित कामाचे तास आणि काही प्रमाणात स्थैर्य मिळते.

येथे पाहा व्हिडीओ

या व्हिडिओमुळे पुन्हा एकदा समाजात एक महत्त्वाचा प्रश्न चर्चेत आला आहे. उच्च कमाई अधिक महत्त्वाची की नोकरीतील स्थिरता आणि सुरक्षितता? अनेकांचे मत आहे की, प्रत्येक व्यवसायाचे स्वतःचे फायदे आणि आव्हाने असतात. त्यामुळे केवळ पैशाच्या आधारे कोणताही व्यवसाय मोठा किंवा लहान ठरवणे योग्य ठरणार नाही.

(डिस्क्लेमर: ही बातमी सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या पोस्टच्या आधारे तयार करण्यात आली आहे. या माहितीची स्वतंत्रपणे पुष्टी करण्यात आलेली नाही.)