Viral Video Man Arrange Grand Birthday Party For Cat : प्राणी प्रेमींबद्दल जितकं बोलावं तितकं कमीच आहे. अगदी त्यांच्यासाठी टोपण नाव ठेवण्यापासून ते त्यांची घरात खाण्यापिण्याची सोय करण्यापर्यंत, त्यांना एखाद्या माणसाप्रमाणे शिस्त लावणे असो किंवा अगदी त्यांना छान-छान कपडे घालणं असो प्राणी प्रेमी नेहमीच त्यांच्याविषयी आपुलकीने काही ना काही करताना दिसतात. तर अशाच एका प्राणी प्रेमी तरुणाचा व्हिडीओ व्हायरल होतो आहे; ज्यामध्ये त्याने अगदी लग्नासारखी तयारी त्याच्या पाळीव मांजराच्या वाढदिवसासाठी केली आहे.
‘जाभ्या’ नावाच्या मांजराच्या वाढदिवसाला केक कापणे, डान्स, बेंजो आणि आजूबाजूची मंडळी, मित्र-मैत्रिणी उत्सवात सहभागी झाल्याचे दृश्य पाहायला मिळाले. व्हिडीओच्या सुरवातीला प्राणी प्रेमी अभिनव सुरुवातीला एका टेबलासमोर बसलेला दिसतो आणि त्याच्या बाजूलाच ती मांजर बसलेली असते; वाढदिवसाचा केक कापण्यापूर्वी तो त्या मांजरीचे पंजे हळुवारपणे हातात घेतो, तर आजूबाजूचे लोक मोठ्या उत्साहाने सेलिब्रेश करताना दिसतात. एवढंच नाही तर अगदी खिडकीला वाढदिवसाचा भला-मोठा बॅनरही लावला आहे.
व्हायरल व्हिडीओतील हे सगळं पाहिलं तर ते साध्या वाढदिवसाच्या पार्टीसारखं नव्हतं. तर एका मोठ्या सार्वजनिक उत्सवासारखं वाटत होतं. कुटुंबीय आणि मित्र खूप उत्साहात डान्स करत होते, एक लाईव्ह बँड तिथे येऊन बँजो वाजवत होता, खूप मोठ्या प्रमाणात जेवण बनवलं जात होतं. मात्र मांजरीच्या चेहऱ्यावर आश्चर्याचे भाव होते. पण, बघणाऱ्यांना वाटतं होतं की, मांजर बहुतेक माणसांपेक्षा स्पष्टपणे अधिक चांगले सामाजिक जीवन जगत आहे. पाळीव मांजरीचा कसा साजरा केला वाढदिवस एकदा बघाच…
व्हिडीओ नक्की बघा…
सोशल मीडियावर व्हायरल होणारा हा व्हिडीओ @abhinaaav.raw या इन्स्टाग्राम अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे. नेटकरी व्हिडीओ पाहून “अरे, मी इथेच जवळ राहते. माझ्या खिडकीतून हे पोस्टर दिसत आहे. मी एवढे दिवस विचार करत होते कोणी लावलय बरं आणि आज त्याचं उत्तर आलं व्हिडीओतून”, “तुला पार्टीला इतर मांजरी आणि त्यांच्या पालकांनाही बोलावायला हवं होतं”, “माझ्या वाढदिवसापेक्षा या मांजरीची बर्थडे पार्टी मस्त होती” ; आदी अनेकविध कमेंट्स नेटकऱ्यांनी व्हिडीओखाली केलेल्या दिसून आल्या आहेत…
