Mumbai man orders food for CJP protesters Viral Video : भविष्याचा पाया म्हणजे शिक्षण आणि तोच जर भक्कम नसेल तर विद्यार्थ्यांना अशी आंदोलने करण्यासाठी रस्त्यावर उतरावचं लागेल; असं नीट पेपर फुटीनंतर सरकारविरोधात कॉक्रोच जनता पार्टीचं (सीजेपी) आंदोलन सांगते आहे. या आंदोलनाचे पडसाद दिल्लीतील जंतरमंतरसह अनेक महत्त्वाच्या शहरांमध्ये दिसून आले आहेत. या आंदोलनात सीजेपी पक्षाचे संस्थापक अभिजीत दिपके यांच्याबरोबर भविष्यासाठी लढणारे अनेक विद्यार्थीही मोठ्या संख्येने मैदानात उतरले आहेत. यादरम्यान या सगळ्यांना पाठिंबा देण्यासाठी, त्यांची मदत करण्यासाठी आणि सेवा करण्यासाठी अनेक मदतीचे हातही पुढे येत आहेत.

सध्या सोशल मीडियावर @SidKeVichaar या एक्स (ट्विटर) अकाउंटवरून असाच एक व्हिडीओ व्हायरल होतो आहे. यामध्ये दिल्लीत न जाता आंदोलनात सहभागी होण्याचा एक वेगळा मार्ग एका मुंबईकराने शोधून काढला आहे. आंदोलक उपाशी राहू नयेत या एका इच्छेपोटी मुंबईकर व्यक्तीने जेवणाचे पैसे ऑनलाइन भरले आणि ते जेवण घेऊन डिलिव्हरी पार्टनरला जंतरमंतर इथे घेऊन जाण्यास सांगितले.

मुसळधार पावसात रेनकोट व हेल्मेट घालून डिलिव्हरी बॉय पार्सल घेऊन तिथे पोहचला आणि ऑर्डर केलेल्या व्यक्तीची ओळख सांगत, फोन दाखवून “मुंबईतील अनुज रावत नावाच्या एका व्यक्तीने ही ऑर्डर दिली आहे, त्याने मला जंतरमंतर येथील आंदोलकांना अन्न देण्यास सांगितले आहे आणि त्याने या ऑर्डरचे पैसे आधीच ऑनलाइन भरले आहेत” असे सांगितले. प्रेमाने अन्न पाठवणाऱ्या आणि ऑर्डर घेऊन येणाऱ्या डिलिव्हरी बॉयचे आंदोलकांनी टाळ्या वाजवून कौतुक केले.

व्हिडीओ नक्की बघा….

डिलिव्हरी पार्टनरचा हा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर नेटकरी “आंदोलनाच्या क्षणी सामान्य लोकांनी दाखवलेली करुणा दिसून येते”, “हे ऐकून माझ्या अंगावर शहारे आले. मला प्रेम जाणवतंय, मला काळजी वाटतेय, किमान एवढं तरी कोणं तरी करतंय”, “असाच भारत आम्हाला कायम पाहायचा आहे”; आदी अनेकविध कमेंट्स नेटकरी व्हिडीओखाली करताना दिसून आले आहेत. झोमॅटोची डिलिव्हरी ही काही एकमेव घटना नव्हती. दिवसभरात आंदोलकांना चहा, जेवण, नाश्ता पोहोचवल्याचे अनेक व्हिडीओ सोशल मीडियावर समोर आले. अनेक नागरिकांनी ऑनलाइन पैसे भरून दूरस्थपणे या उपक्रमात योगदान दिले आणि आंदोलकांसाठी अन्नाची व्यवस्था केली.