मुंबईसारख्या मोठ्या शहरात रोज हजारो घटना घडत असतात. काही गोष्टी गर्दीतच हरवून जातात, तर काही गोष्टी आपल्याला माणुसकीवर पुन्हा विश्वास ठेवायला भाग पाडतात. धावपळ, गोंगाट आणि सतत बदलणाऱ्या या शहराच्या आयुष्यात संवेदनशीलता जपणं खरंच खूप अवघड झालं आहे. अशा परिस्थितीत जेव्हा एखादी व्यक्ती, विशेषतः सार्वजनिक सेवेत काम करणारी, आपलं कर्तव्य सोडून माणुसकी दाखवते, तेव्हा ती घटना खास ठरते.
ती केवळ एक बातमी राहत नाही, तर समाजाला थांबून विचार करायला लावणारा क्षण बनते. अशाच एका छोट्याशा, पण मनाला भिडणाऱ्या कृतीमुळे मुंबई पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. या घटनेनं अनेकांच्या डोळ्यांत पाणी आणलं, तर अनेकांनी त्या व्यक्तीचं मनापासून कौतुक केलं. सोशल मीडियावर या घटनेचे फोटो व व्हिडीओ मोठ्या प्रमाणात शेअर झाले आणि काही क्षणांसाठी तरी मुंबईच्या धावपळीच्या आयुष्यात माणुसकीचा चांगला चेहरा समोर आला.
मुंबईतील खार परिसरात घडलेली ही घटना आहे. खार पोलीस ठाण्याच्या मार्शल स्क्वॉडमधील पोलीस शिपाई सुशील शिखरे हे नेहमीच्या ड्युटीवर असून, त्या परिसरात फिरत होते. त्या वेळी त्यांच्या लक्षात आले की, एका गजबजलेल्या फुटपाथवर एक लहान बाळ झोपलेले आहे. बाळासाठी लाकडी फळ्या आणि कापड वापरून एक तात्पुरता पाळणा तयार करण्यात आला होता, जो खूप असुरक्षित होता.
आजूबाजूला वाहनांची गर्दी, लोकांची सततची ये-जा, धूळ, प्रदूषण व किडे यांमुळे त्या बाळाच्या सुरक्षिततेला धोका निर्माण होऊ शकत होता. हे दृश्य पाहून सुशील शिखरे अस्वस्थ झाले. त्यांनी तो सुरक्षित नसलेला पाळणा हलवला, तेव्हा बाळाच्या आईला क्षणभर भीती वाटली की, तिच्या बाळाला घेऊन जात आहे का? पण काही वेळातच शिखरे एक मजबूत, तयार पाळणा घेऊन परत आले. त्यांनी आईला त्या माऊलीला समजावून सांगितलं की, बाळाला सुरक्षित झोप मिळावी म्हणून ते ही व्यवस्था करत आहेत.
पाहा व्हिडीओ
सुशील शिखरे यांनी तो पाळणा शांतपणे उघडला, ते तो नीट लावताना आणि बाळाला त्या पाळण्यात अत्यंत काळजीपूर्वक ठेवताना दिसतात. आईच्या चेहऱ्यावर त्या क्षणी हास्य दिसत होते. तिला खूप बर वाटतं हे पाहून असं तिज्या चेहऱ्यावरून दिसत होत. या संपूर्ण घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होताच नागरिकांकडून मोठ्या प्रमाणात सकारात्मक प्रतिक्रिया येऊ लागल्या.
अनेकांनी या याला “खरी माणुसकी” असे म्हटले. “आज पाहिलेला सगळ्यात सुंदर व्हिडीओ,” अशी प्रतिक्रिया एका युजरने दिली. तर दुसऱ्याने, “तुमचं हृदय तुमच्या बायसेप्स आणि ट्रायसेप्सइतकंच मोठं आहे,” अशा शब्दांत कौतुक केले. “भारताला अशाच पोलिसांची गरज आहे,” असेही अनेकांनी म्हटले. काहींनी तर सुशील शिखरे यांना “खरा सरकारी कर्मचारी” आणि “अभिमानास्पद पोलीस” असे म्हटले आहे.

