कोणताही सण, उत्सव असो किंवा कोणताही मोठा कार्यक्रम असो, घरातील भांडण असो की राजकीय मोर्चा मुंबई पोलीस हे नेहमीच आपल्या कर्तव्यासाठी तत्पर असतात.आपल्या कामगिरीचा ठसा उमटवणारे आणि दहशतवाद्यांचा कर्दनकाळ ठरलेल्या मुंबई पोलिसांचा जगात गाजावाजा आहे. मुंबई पोलिसांमधील अनेक कर्मचारी आणि अधिकाऱ्यांनी या मुंबईसाठी जीवाची बाजी लावलीय. घर-दार विसरुन कर्तव्य सर्वश्रेष्ठ मानणाऱ्या मुंबई पोलिसांचे अनेक किस्से आपण एकत असतो. हे कर्तव्य बजावत असताना पोलिसांना नेहमीच प्रॅक्टीकल रहावं लागतं, त्यामुळे आपल्याला पोलीस हे कठोर वाटतात. मात्र बऱ्याचदा याच पोलिसांची दुसरी बाजू आपल्याला माहिती नसते. मात्र जेव्हा निरोपाची वेळ येते तेव्हा मात्र पोलिसांच्याही भावनांना पाझर फुटतो. असाच एका सेवानिवृत्त पोलीसाला निरोप देतानाचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
सेवानिवृत्तीच्या दिवशी ‘साहेब’च ड्रायव्हर बनतात –
एका सेवानिवृत्त पोलिस ड्रायव्हरला निरोप देतानाचा भावनिक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. मुंबईच्या गावदेवी पोलीस ठाण्यामध्ये वरिष्ठ पोलीस निरीक्षक यांच्या गाडीवर ड्रायव्हर म्हणून कार्यरत ASI सुनील मोरे हे आज जवळपास 36 वर्षांनंतर पोलीस खात्यातून सेवानिवृत्त झाले. त्यानिमित्ताने त्यांचं आज गावदेवी पोलीस ठाण्यामध्ये अत्यंत आगळंवेगळं स्वागत झालं. एवढंच नव्हे तर नोकरीवर असताना सुनील मोरे जी गाडी चालवित होते त्याच गाडीत त्यांना बसवून त्यांच्या वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी आज गाडी स्वतः चालवित त्यांनाच सन्मान केला. आपण जिथे काम करतो, दिवस-रात्र एक करुन मेहनत करतो, संघर्ष करतो तिथल्या वरिष्ठांनी आपल्याला अशा पद्धतीने आपला सत्कार करणं, यापेक्षा मोठा सन्मान काय असेल! सर्व सहकाऱ्यांनी सेवानिवृत्तीच्या दिवशी अशाप्रकारे केलेल्या सन्मानाने सुनील मोरे हे अत्यंत भारावून गेले.
पाहा व्हिडीओ –
हेही वाचा – video: कॉलेजचा शेवटचा दिवस, विद्यार्थी बेभान; अचानक स्लॅब कोसळून २५ विद्यार्थी..
हा व्हिडीओ पाहून अनेक जण भावूक झाले आहेत. तर वरीष्ठ पोलीस निरीक्षक शशिकांत यादव यांनी केलेल्या आगळ्या वेगळ्या सन्मानाचे सर्वत्र कौतुक होत आहे.