Rahul Gandhi And Nitish Kumar Viral Video Fact Check : लाईटहाऊस जर्नालिझमला सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर मोठ्या प्रमाणावर शेअर केला जाणारा एक व्हिडीओ सापडला आहे. या व्हिडीओमध्ये लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी आणि बिहारचे माजी मुख्यमंत्री तसेच जनता दल (युनायटेड) अर्थात JD(U) पक्षाचे अध्यक्ष नितीश कुमार हे दोघे एकत्र पत्रकार परिषदेला संबोधित करताना दिसत होते.

या व्हिडीओमध्ये नितीश कुमार असे म्हणताना ऐकू येतात की, “देशभरातील जास्तीत जास्त राजकीय पक्षांना एकत्र आणण्याचा आम्ही प्रयत्न करू.” त्याचबरोबर हा व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर करत असा दावा केला जात आहे की, मतदार यादीतील कथित अनियमिततेविरोधात INDIA आघाडीने सुरू केलेल्या आंदोलनात नितीश कुमार आता राहुल गांधी यांची साथ देणार आहेत. म्हणजेच या आंदोलनात सहभागी होण्यासाठी नितीश कुमार INDIA आघाडीत सामील होणार असल्याचा दावा केला जात आहे.

पण, आमच्या तपासादरम्यान आम्हाला आढळले की हा व्हिडीओ जुना आहे आणि अलीकडचा नाही. नितीश कुमार यांनी अलीकडे राहुल गांधींबरोबर हातमिळवणी केलेली नाही.

काय होत आहे व्हायरल?

इन्स्टाग्राम युजर @chetan_dhaduk_d यांनी हा व्हिडीओ अलीकडचा असल्याचा दावा करत शेअर केला आहे.

https://www.instagram.com/reels/DelYLs5FZpR

इतर युजर्सदेखील हाच व्हिडीओ अलीकडच्या भेटीचा असल्याचे दाखवून शेअर करत आहेत.

https://www.instagram.com/reels/DelZ_NEh4SW

तपास

आम्ही या व्हिडीओतील काही महत्त्वाच्या फ्रेम्स (कीफ्रेम्स) घेऊन त्यांचा रिव्हर्स इमेज सर्च केला आणि त्याद्वारे या व्हिडीओची सत्यता तपासण्यास सुरुवात केली.

आम्हाला १४ जुलै २०२३ च्या एका वृत्त अहवालात या व्हिडीओचा स्क्रीनशॉट सापडला.

https://www.bbc.com/hindi/articles/c297p97k507o

तसेच आम्हाला १२ एप्रिल २०२३ रोजी एएनआयने (ANI) पोस्ट केलेला व्हिडीओदेखील सापडला, ज्यामध्ये तत्कालीन बिहारचे मुख्यमंत्री नीतीश कुमार म्हणाले होते, “आम्ही शक्य तितक्या राजकीय पक्षांना एकत्र आणण्याचा आणि एकत्र पुढे जाण्याचा प्रयत्न करू.”

आम्हाला त्याच पत्रकार परिषदेतील इतर फोटोदेखील मिळाले.

https://www.prokerala.com/news/photos/congress-leader-rahul-gandhi-with-bihar-cm-nitish-kumar-at-during-a-3471485.html

कॅप्शनमध्ये म्हटले आहे – काँग्रेस नेते राहुल गांधी हे नवी दिल्लीत बुधवार, १२ एप्रिल २०२३ रोजी एका पत्रकार परिषदेदरम्यान बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्याबरोबर होते.

आम्हाला टाईम्स ऑफ इंडियाच्या वेबसाईटवर याविषयीचा एक अहवालही मिळाला.

https://timesofindia.indiatimes.com/city/patna/bihar-cm-nitish-kumar-rjd-chief-lalu-prasad-talk-opposition-unity/articleshow/99418838.cms

निष्कर्ष

राहुल गांधी आणि नितीश कुमार यांच्या भेटीचा एक जुना व्हिडीओ, नितीश कुमार यांनी इंडिया आघाडीच्या आंदोलनाला पाठिंबा दिल्याचा दावा करत अलीकडचा म्हणून व्हायरल केला जात आहे, त्यामुळे हा व्हायरल दावा दिशाभूल करणारा आहे.