आजच्या धावपळीच्या जीवनात माणूस कायम यश, पैसा व प्रतिष्ठेच्या मागे धावत असतो. सोशल मीडियावर बहुतेक वेळा झगमगाट, आलिशान जीवन आणि सुखी आयुष्य दाखवणारे फोटो-व्हिडीओच जास्त दिसतात. पण कधी कधी एखादा साधा आणि खरा व्हिडीओ थेट मनाला भिडतो. असे व्हिडीओ पाहिल्यावर आपण थोडे थांबतो आणि आयुष्याचा खरा अर्थ काय आहे, आत्मसन्मान म्हणजे काय आणि मेहनतीचे महत्व किती मोठे आहे, याचा विचार करायला लागतो. काही व्हिडीओ कोणताही गाजावाजा न करता, सरळ हृदयात घर करतात. त्यामध्ये ना अभिनय असतो, ना खोटेपणा.

तर असतो फक्त आयुष्याचा खरा संघर्ष. असाच एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत असून, तो पाहताना अनेकांच्या डोळ्यांत नकळत पाणी येत आहे.सध्या व्हायरल होत असलेल्या या व्हिडीओमध्ये मुंबई लोकल ट्रेनमधील एक हृदयस्पर्शी दृश्य पाहायला मिळते. या व्हिडीओत ८९ वर्षांची एक वृद्ध महिला लोकल ट्रेनमध्ये मोत्यांपासून तयार केलेली ब्रेसलेट विकताना दिसते.

वयाच्या या टप्प्यावर जिथे बहुतेक लोकांना आधाराची गरज असते, तिथे ही आजी स्वतःच्या मेहनतीवर जगत आहे. व्हिडीओमध्ये त्या सांगतात की, गेली तब्बल ६० वर्षे त्या हेच काम करत आहेत. वाकलेली कंबर, थकलेला चेहरा असला तरी त्यांच्या डोळ्यांंत आत्मसन्मानाची आणि आत्मनिर्भरतेची चमक स्पष्ट दिसते. त्या कोणाकडे मदत मागत नाहीत, ना सहानुभूतीची अपेक्षा करतात. गर्दीने भरलेल्या मुंबई लोकल ट्रेनमध्ये त्या शांतपणे प्रवाशांना ब्रेसलेट दाखवत राहतात.

पाहा व्हिडीओ

“वय कधीच मेहनतीच्या आणि हौसेच्या आड येऊ शकत नाही,” असे त्या ठामपणे सांगतात. कोणताही देखावा नाही, कोणतीही भाषणबाजी नाही फक्त सन्मानाने जगण्याचा प्रयत्न या दृश्यातून दिसून येतो.हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होताच लोकांच्या भावना उफाळून आल्या. अनेकांनी प्रतिक्रियांमध्ये या आजींना “खरी हिरोईन” म्हटले आहे. काही युजर्सनी त्यांच्या जिद्दीला आणि कष्टाला मनापासून सलाम केला आहे.

तर काहींनी लिहिले, “हा व्हिडीओ पाहून आयुष्याकडे पाहण्याचा दृष्टिकोनच बदलून गेला.” अनेकांनी आजच्या पिढीला या व्हिडीओतून प्रेरणा घ्यावी, असे मत व्यक्त केले. काही जणांनी वृद्धांसाठी सुरक्षित आणि सन्मानजनक जीवनाची गरज अधोरेखित केली. हा व्हिडीओ केवळ एक घटना नसून, तो आत्मसन्मान, मेहनत आणि स्वाभिमानाचे जिवंत उदाहरण ठरत आहे, असेच नेटकऱ्यांचे मत आहे.