लहान लेकरांना त्यांच्या आवडीचे काही घेऊन दिले नाही, तर ते रडतात, ओरडतात, आपली मागणी लावून धरतात, असे तुम्ही बघितले असेल. पण मध्य प्रदेशातील एक चिमुकला आपल्या आईपासून इतका रुसला की त्याने चक्क तिची तक्रार पोलिसांना केल्याचे समोर आले आहे. तसा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. मुलाने महिला पोलीस अधिकाऱ्याला जे सांगितले ते ऐकून तुम्ही पोट धरू हसाल.

व्हिडिओमध्ये एक महिला पोलीस अधिकारी ३ वर्षांच्या लहान मुलाची तक्रार नोंदवताना दिसत आहे. चिमुकला पोलीस अधिकाऱ्याला त्याच्या आईची तक्रार करत आहे. मला आईने गालावर मारले अशी तक्रार मुलाने केली. तसेच, आई माझे चॉकलेट चोरते, असे देखील मुलाने महिला पोलीस अधिकाऱ्याला सांगितले. त्याची तक्रार ऐकून पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना हसू आवरत नव्हते.

(Viral video : शाळेच्या बसमध्ये आढळला ११ फूट लांब अजगर, बाहेर निघतच नव्हता, शेवटी..)

व्हिडिओ मध्य प्रदेशातील बुरहानपूर येथील असल्याचे समजले आहे. येथील महिलेने आपल्या मुलाची आंघोळ घातल्यानंतर त्यास काजळ आणि टीका लावण्याचा प्रयत्न केला, मात्र चिमुकल्याने स्पष्ट नकार दिला. त्यावरून आईने त्याच्या गालावर थापड मारली. त्यामुळे नाराज झालेल्या चिमुकल्याने थेट वडिलांकडे आईला तुरुंगात घालण्याची मागणी केली. हे ऐकून पती पत्नी दोघांनाही चांगलाच हशा पिकला. पण मुलगा हट्ट सोडत नसल्याने त्याला पोलीस ठाण्यात नेले.

पोलीस ठाण्यासमोर महिला पोलीस अधिकारी प्रियंका नायक यांनी मुलाची तक्रार ऐकली. चिमुकल्याची तक्रार ऐकताना त्यांना देखील हसू फुटले. प्रियंका यांनी मुलाला समजवले त्यानंतर त्यास घरी पाठवले. दरम्यान या निरागस बाळाचा व्हिडिओ व्हायरल होत आहे. व्हिडिओ पाहून लोकांना हशा पिकत आहे.