Car shocking stunt video on road : आजकाल सोशल मीडियावर प्रसिद्ध होण्यासाठी काही लोक धोकादायक कृत्ये करताना दिसतात. लाईक्स आणि व्ह्युज मिळवण्याच्या नादात ते लोकांच्या सुरक्षिततेकडे दुर्लक्ष करतात. विशेषतः तरुणांमध्ये स्टंट करण्याची क्रेझ वाढली असून, रस्त्यांना जणू स्टंट करण्याची जागा समजलं जात आहे. वेगात गाडी चालवणे, धोकादायक कसरती करणे; यातून कायद्याचे नियम मोडले जातात. पण, यामुळे किती मोठा धोका निर्माण होऊ शकतो याचा विचार फारसे लोक करत नाहीत. अशा प्रकारांमुळे स्टंट करणाऱ्यांसोबतच रस्त्यावरून जाणाऱ्या सामान्य नागरिकांचाही जीव धोक्यात येतो. नियम आणि शिस्त पाळली नाही तर शहरातील सुरक्षिततेला मोठा धोका निर्माण होतो.
मध्य प्रदेशातील ग्वालियर शहरात एक धक्कादायक घटना घडली आहे. शहरातील फूलबाग परिसरातील खूप गर्दी असलेल्या चिड़ियाघर चौकात काही तरुणांनी कार चालवून धोकादायक स्टंट केले, ज्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. संध्याकाळच्या वेळी, जेव्हा चौकात वाहनं आणि लोकांची गर्दी असते तेव्हा त्यांनी अचानक कारला कट मारली, भयानक वळण घेतलं आणि चालत्या वाहनांमध्ये गाडी फिरवली, त्यामुळे रस्त्यावर प्रचंड गोंधळ उडाला. अनेक वाहनचालकांना अचानक ब्रेक मारावे लागले, तर काहींनी अपघात टाळण्यासाठी मार्ग बदलला.
पाहा व्हिडीओ
कुटुंबांसह असलेले लोक घाबरून बाजूला गेले. स्थानिकांनी सांगितले की, काही वेळ परिस्थिती हाताबाहेर गेल्यासारखी वाटत होती आणि त्यामुळे मोठा अपघात होऊ शकला असता. याची माहिती मिळताच FRV पोलिस घटनास्थळी पोहोचले, पण पोलिसांना पाहताच हे स्टंट करणारे तरुण आपल्या कारसह पळून गेले.
या घटनेनंतर लोक खूप नाराज झाले आहेत. “ग्वालियरमध्ये पोलिस तपासणी करतात, दंड करतात तरीही अशा घटना कशा होतात?” असा प्रश्न अनेकांनी विचारला आहे. सोशल मीडियावर लोकांनी या स्टंट करणाऱ्यांची ओळख पटवून त्यांच्यावर कडक कारवाई करण्याची मागणी केली आहे. काही लोक म्हणतात की, यांना लगेच थांबवले नाही तर भविष्यात मोठा अपघात होऊ शकतो. तरुणांनी थरारासाठी रस्त्यांचा वापर करू नये, रस्ते फक्त सुरक्षित प्रवासासाठी आहेत, स्टंटसाठी नाहीत असा सल्ला अनेकांनी दिला आहे. लोक अपेक्षा करत आहेत की पोलिस प्रशासनाने याकडे गंभीरपणे लक्ष द्यावे आणि दोषींवर कठोर कारवाई करावी.

