Viral Video: सोशल मीडियावर युजर्सचं लक्ष वेधून घेण्यासाठी विविध प्रकारचे व्हिडिओ शेअर केले जातात. मात्र, त्यापैकी काहीच असे व्हिडीओ असतात जे लोकांना खरोखरच आश्चर्यचकित करतात. सध्या असाच एक व्हिडिओ मोठ्या प्रमाणावर चर्चेत आला आहे.
सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या या व्हिडिओमध्ये एक मोठा हॉल दिसतो, ज्याच्या बाजूला एक दरवाजा लावलेला असतो. पहिल्या नजरेत हा दरवाजा अगदी सामान्य वाटतो, जणू काही तो वॉशरूम किंवा स्टोअररूमचा असावा. तिथे उभे असलेले काही तरुण विद्यार्थी हा दरवाजा पाहून तो नेमका कशासाठी असेल, याबद्दल चर्चा करू लागतात.
बंद दरवाज्याने सगळ्यांना चकित केले
व्हायरल व्हिडिओमध्ये पुढे आपण पाहू शकतो की, त्या विद्यार्थ्यांना दरवाज्यामागचे रहस्य जाणून घेण्याची उत्सुकता असते. शेवटी ते दरवाजा उघडण्याचा निर्णय घेतात. मात्र, दरवाजा उघडताच आतले दृश्य पाहून सगळेच थक्क होतात. कारण त्या दरवाज्यामागे कोणतीही खोली किंवा मार्ग दिसत नाही, तर मोठी मोकळी अशी जागा दिसते. म्हणजेच, जर कोणीही विचार न करता हा दरवाजा उघडून पुढे गेलं, तर ती व्यक्ती थेट खाली कोसळू शकते. हे दृश्य इतकं धक्कादायक आहे की ते पाहून कोणाच्याही अंगावर काटा येईल.
इन्स्टाग्रामवर व्हायरल झालेला हा व्हिडीओ @shreeram_sane या अकाउंटवरून शेअर करण्यात आला असून याला १२६ हजार व्ह्युज आले आहेत. तर “माझ्या कॉलेजवर पुन्हा कधीही विश्वास ठेवणार नाही.” अशी कॅप्शन व्हिडीओला देण्यात आली आहे. व्हिडीओ व्हायरल होताच अनेकांनी यावर भरभरून प्रतिक्रिया दिल्या आहेत.
युजर्सच्या प्रतिक्रिया
सामान्य दिसणाऱ्या या दरवाज्यामागे इतका मोठा धोका दडलेला असेल, याची कल्पनाही कुणाला आली नव्हती. व्हिडिओ समोर आल्यानंतर सोशल मीडियावर अनेकांनी यावर प्रतिक्रिया दिल्या.
काहींनी याला अत्यंत धोकादायक निष्काळजीपणा म्हटले. तर काहींनी अशा प्रकारचे दरवाजे लोकांच्या जीवासाठी धोकादायक ठरू शकतात, असे मत व्यक्त केले. काहींनी तर असा प्रश्नही उपस्थित केला की, अशी रचना नेमकी कोणी आणि कशासाठी केली असेल.
