चिपळूण शहरालगत वाहणाऱ्या शिव आणि वाशिष्ठी नदीतील मगरी आता शहरातील रस्त्यांवर मुक्त संचार करू लागल्या आहेत. शहरातील गोवळकोटकडे जाणाऱ्या रस्त्यावर सोमवारी रात्री वाहनचालकांना एक मगर चक्क रस्ता अडवून चालताना आढळली आणि त्यांची पाचावर धारण बसली. काहीजणांनी या मगरीचे चित्रीकरण सुरू केले. काहींनी गाड्यांचे दिवे मोठे करून हॉर्नही वाजवले. मात्र रस्त्याच्या मध्यभागातून चालणाऱ्या या मगरीने न घाबरता रस्ताही ओलांडला.

चिपळूणमध्ये येणाऱ्या पुरावर उपाययोजना करण्यासाठी शिव आणि वाशिष्ठी नदीतील गाळ काढण्याचे काम सुरू आहे. गाळ काढताना वाशिष्ठी नदीतील अनेक वर्षांपूर्वीचे जुने बेटही काढण्याचा घाट घातला जात आहे. पालिकेने शिवनदी गाळ काढून नदी केली. नदी किनारी असलेली झाडीझुडपेही तोडण्यात आली. त्यामुळे या नदीतील मगरींचा अधिवास संपु्ष्टात आला आहे.

पाहा व्हिडीओ –

वाशिष्ठी नदी व खाडीमध्ये असणारे नैसर्गिक बेट हा येथील मगरींचा मुख्य नैसर्गिक अधिवास आहे. तेथे मगरींची घरटी, अंडी आणि पिल्ले असतात. आतापर्यंत शिवनदीतही मगरी निर्धास्तपणे वावरत होत्या. एखाद दुसरी मगर मानवी वस्तीत येत होती. मात्र त्यांनी कधी कोणावर हल्ला केला नाही. आता शिवनदीतील झाडीझुडपे काढल्यामुळे मगरींचा विसावा घेण्याचे नैसर्गिक ठिकाण संपुष्टात आले आहे. त्यामुळे त्यांचा वावर मानवी वस्तीच्या दिशेने सुरू झाला आहे.