Viral Video: मुंबईजवळील डोंबिवली रेल्वे स्थानकावर घडलेल्या एका धक्कादायक घटनेने पुन्हा एकदा धावत्या मुंबई लोकलमध्ये चढण्याचा प्रयत्न किती धोकादायक ठरू शकतो, हे समोर आणले आहे. ७० वर्षीय एका व्यक्तीचा जीव सरकारी रेल्वे पोलिसांच्या (GRP) एका जवानाच्या प्रसंगावधानामुळे थोडक्यात वाचला. ही संपूर्ण घटना कॅमेऱ्यात कैद झाली आहे.

व्हायरल व्हिडीओ

सोशल मीडियावर व्हायरल झालेली ही घटना गर्दीने गजबजलेल्या डोंबिवली रेल्वे स्थानकावर घडली. मुंबईच्या उपनगरीय रेल्वे मार्गावरून दररोज लाखो प्रवासी प्रवास करतात. नव राष्ट्रच्या वृत्तानुसार, अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार पंडित वाघ नावाचे हे ज्येष्ठ नागरिक प्लॅटफॉर्म क्रमांक १ वर उभे होते. त्यावेळी त्यांनी धावत्या लोकलमध्ये चढण्याचा प्रयत्न केला.

मात्र, ट्रेनमध्ये चढताना त्यांचा तोल गेला आणि ते प्लॅटफॉर्म व धावत्या ट्रेनमधील धोकादायक फटीत पडण्याच्या स्थितीत आले. त्यामुळे त्यांच्या जीवाला मोठा धोका निर्माण झाला.

याच वेळी डोंबिवली जीआरपीचे पोलीस शिपाई अनिल शेळके यांनी प्रसंगावधान दाखवत धाडसाने धाव घेतली. त्यांनी ज्येष्ठ नागरिकांना धोक्यात पाहताच काही क्षणांत त्यांना सुरक्षितपणे ओढून बाहेर काढले. त्यामुळे मोठी दुर्घटना टळली आणि त्या प्रवाशाचा जीव वाचला.

घटनेनंतर पंडित वाघ यांनी आपला जीव वाचवल्याबद्दल पोलीस शिपाई अनिल शेळके यांचे आभार मानले. स्थानकावरील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात हा थरारक बचाव कैद झाला असून, त्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला आहे. अनेकांनी पोलिसांच्या धाडसाचे आणि तत्परतेचे कौतुक केले आहे.

रेल्वे प्रशासनाने पुन्हा एकदा प्रवाशांना धावत्या ट्रेनमध्ये चढू किंवा उतरू नये, असे आवाहन केले आहे. काही मिनिटे वाचवण्यापेक्षा स्वतःची सुरक्षितता महत्त्वाची असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. तसेच, जीव धोक्यात घालण्याऐवजी पुढील ट्रेनची वाट पाहावी, असेही प्रशासनाने स्पष्ट केले.

सोशल मीडियावर व्हायरल हा व्हिडीओ@jilha.varta या इन्स्टाग्राम अकाउंटवरून शेअर करण्यात आला असून, याला तब्बल २२.७ हजार व्ह्यूज आले आहेत. ‘धावती लोकल पकडण्याचा प्रयत्न! ७० वर्षीय ज्येष्ठाचा जीव थोडक्यात बचावला, जीआरपी पोलीस अनिल शेळके यांचे प्रसंगावधान, घटना CCTV मध्ये कैद’ असं कॅप्शन देण्यात आलं आहे.