Viral Video: सोशल मीडियावर सध्या केरळमधील एक अंगावर काटा आणणारा व्हिडिओ जोरदार व्हायरल होत आहे. हा व्हिडिओ पाहिल्यानंतर लोक मोठ्या भावाला ‘रिअल लाइफ सुपरहिरो’ म्हणत आहेत. केरळमधील मलप्पुरम येथे एका मोठ्या भावाने स्वतःच्या जीवाची पर्वा न करता असे काही केले, ज्यामुळे सर्वजण थक्क झाले.

ही संपूर्ण घटना घराच्या आत आणि बाहेर लावलेल्या CCTV कॅमेऱ्यांमध्ये कैद झाली आहे. घडले असे की, ६ वर्षांचा एक लहान मुलगा आपल्या घराच्या अंगणात खेळत होता. तेवढ्यात अचानक एका भटक्या कुत्र्याने त्याच्यावर हल्ला केला. त्यामुळे घाबरलेल्या मुलाने मोठ्याने आरडाओरडा करण्यास सुरुवात केली.

पहिल्या मजल्यावरून मारली थेट उडी

पहिल्या मजल्यावरील बाल्कनीत उभ्या असलेल्या मोठ्या भावाने आपल्या लहान भावाची किंकाळी ऐकताच क्षणाचाही विलंब केला नाही. काहीही विचार न करता त्याने थेट पहिल्या मजल्यावरून अंगणात उडी मारली. खाली येताच तो लगेच कुत्र्याकडे धावला आणि त्याला तेथून पळवून लावले. मोठ्या भावाचा धाडसी आणि निर्भीड अवतार पाहून कुत्राही घाबरून तिथून पळून गेला. या संपूर्ण घटनेत दोन्ही भावांना किरकोळ दुखापत झाली असली तरी मोठा अनर्थ टळला. सध्या दोघेही पूर्णपणे सुरक्षित आहेत.

सोशल मीडियावर कौतुकाचा वर्षाव

सोशल मीडियावर व्हायरल झालेला हा व्हिडीओ @nvu_india इंस्टाग्राम अकाउंटवरून शेअर केला आहे. व्हिडीओ व्हायरल होताच याला तब्बल ३.३ मिलियन व्ह्यूज आले आहेत.

युजर्सच्या प्रतिक्रिया

सोशल मीडियावर हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर मोठ्या भावाच्या धाडसाचे सर्वत्र कौतुक होत आहे. अनेकजण या घटनेला भावाच्या निस्वार्थ प्रेमाचे आणि जिवाभावाच्या नात्याचे उत्तम उदाहरण म्हणत आहेत. लोकांचे म्हणणे आहे की, सुपरहिरो फक्त चित्रपटांमध्येच नसतात, तर खऱ्या आयुष्यातही असतात आणि या मोठ्या भावाने ते सिद्ध करून दाखवले आहे.

एकाने कमेंट करत लिहिलं, “जेव्हा कुटुंबाचा विषय असतो तेव्हा मुलं कायम पुढे असतात.” तर दुसऱ्याने “भावाचं प्रेम” अशी कमेंट केली.