Girl died during Bungee Jumping fact check : जगभरात असे अनेक लोक आहेत, ज्यांना काहीतरी साहसी गोष्ट करण्याची आवड असते. यासाठी वेळात वेळ काढून ते प्रवासासाठी जातात. प्रवासाची आणि काहीतरी नवीन शिकण्याची, करण्याची आवड जोपासण्यासाठी ते वेगवेगळ्या ठिकाणांचा शोध घेत असतात. पण, यांचे साहस पाहणाऱ्याच्या काळजाचा ठोका चुकवणारे असते. काही दिवसांपूर्वीच तरुणीच्या साहसाचा असाच एक व्हिडीओ तुफान व्हायरल झाला होता, जो कदाचित तुम्हीही पाहिला असेल. भलतं साहस करताना तिचा मृत्यू झाला, अशी माहिती त्या व्हिडीओवर लिहिण्यात आली होती.
ऋषिकेश येथे एका पार्कमध्ये दोरीचा वापर करून साहसी ॲक्टिव्हिटी (बंजी जंपिंग) करताना एका मुलीची मान मोडली आणि तिचा जागीच मृत्यू झाला. अनेक जणांनी व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर करत मुलीच्या मृत्यूचा दावा केला. एका फेसबुक युजरने व्हिडीओ शेअर करत अशीच काहीशी माहिती दिली होती. पण, आज तकने दिलेल्या वृत्तानुसार आणि फॅक्ट चेकमध्ये समोर आलेल्या माहितीनुसार आणि ठोस पुरावा म्हणजे स्वतः तरुणीने शेअर केलेल्या व्हिडीओमध्ये असे दिसून आले आहे की, मुलगी फिजा खान हिचा मृत्यू झाला नाही किंवा तिची मानसुद्धा मोडली नाही. तिने हा व्हिडीओ ऋषिकेशचा नसून राजस्थानमधील माउंट अबूचा आहे असेसुद्धा नमूद केले आहे.
सत्य कसे कळले?
काही दिवसांपूर्वी व्हायरल झालेल्या व्हिडीओवर अनेक लोक कमेंट करत होते की, ती मुलगी जिवंत आहे आणि तिचे नाव फिजा आहे. या माहितीचा वापर करून तिचे इन्स्टाग्राम अकाउंट शोधण्यात आले. फिजा खान नावाच्या मुलीचा एक व्हिडीओ सापडला, ज्यामध्ये तिने स्वतः घटनेबाबत स्पष्टीकरण दिले आहे. त्यात फिजा म्हणते की, तिच्या पाठीचे किंवा मानेचे हाड मोडले नसून ती पूर्णपणे सुरक्षित आहे. त्याचबरोबर खोट्या बातम्या पसरवणाऱ्या अकाउंटची तक्रार करेल, असाही दावा तिने व्हिडीओत केला आहे.
व्हिडीओ नक्की बघा…
या पोस्टमध्ये फिजाने माउंट अबूच्या व्हिक्टरी फन पार्कला टॅग केलं आहे. या पार्कच्या इन्स्टाग्राम अकाउंटवर फिजाच्या व्हायरल व्हिडीओच्या ठिकाणाहून अनेक व्हिडीओ शेअर केले आहेत. व्हिक्टरी फन पार्कचे व्यवस्थापक कमलेश विष्णोई आज तकशी बोलताना म्हणाले, हा व्हिडीओ १५ फेब्रुवारी रोजी शूट करण्यात आला होता. तसेच ही ॲक्टिव्हिटी बंजी जंपिंग नसून रॉकेट इजेक्टर नावाचा साहसी खेळ आहे. पण, तिला दुखापत झाली नाही हेही तितकंच खरं आहे. पण, काही लोकांनी व्हिडीओ शेअर करून दावा केला की तिचा मृत्यू झाला.
कमलेशच्या मदतीने फिजाशीही संपर्क साधण्यात आला. फिजा उदयपूरची वेडिंग फोटोग्राफर आहे. तिच्या मैत्रिणींबरोबर ती माउंट अबूला गेली होती. या ॲक्टिव्हिटीमध्ये ती थोडी घाबरली होती, पण स्वतःच्या मित्रांना दाखवण्यासाठी तिने घाबरल्याचा अभिनय केला; पण तिचा मृत्यू झाला नाही. यादरम्यान तिला चक्करसुद्धा आली नाही आणि अनेक जण तिच्या मृत्यूच्या बातम्या पसरवत आहेत.” सोशल मीडियावर व्हायरल होणारा हा व्हिडीओ तरुणीच्या @fizaa_khan_udr या इन्स्टाग्राम अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे.
