Dubai House Viral Video: दुबईमध्ये राहणारी एक भारतीय महिला सध्या सोशल मीडियावर खूप चर्चेत आहे. याचे कारण म्हणजे तिचं आलिशान १BHK अपार्टमेंट आणि त्यासाठी ती देत असलेले मोठे भाडे. महिलेने तिच्या घराचा व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केला असून, त्यामध्ये तिने सांगितले की या अपार्टमेंटसाठी ती दरवर्षी सुमारे १,२०,००० ऑस्ट्रेलियन डॉलर म्हणजेच जवळपास ३१ लाख रुपये भाडे देते. ही माहिती समोर आल्यानंतर इंटरनेटवर लोकांमध्ये चर्चा सुरू झाली की इतके भाडे देणे योग्य आहे की नाही.

व्हिडिओमध्ये त्या त्यांच्या सुंदर घराची सफर घडवताना दिसतात. हे अपार्टमेंट दुबई मरीना परिसरात असून, त्याची सर्वात मोठी खासियत म्हणजे त्याचे उत्तम लोकेशन आणि समुद्राचे मनमोहक दृश्य. व्हिडिओमध्ये घरात आरामदायी लिव्हिंग रूम आणि एक मोठा बेडरूम असल्याचे दिसते. या दोन्ही ठिकाणांहून समुद्र आणि आसपासचे सुंदर दृश्य पाहता येते. याशिवाय घरात दोन बाथरूम, वॉक-इन क्लोसेट, वेगळी युटिलिटी जागा असलेले आधुनिक किचन आणि समुद्राकडे उघडणारी मोठी बाल्कनीही आहे.

प्रीमियम निवासी प्रकल्पाचा भाग

नितिका यांनी सांगितले की त्यांच्या घरातील सर्वात आवडती जागा म्हणजे बाल्कनी. येथून त्यांना दुबई आयचे अप्रतिम दृश्य दिसते. व्हिडिओमध्ये त्यांनी विनोदी अंदाजात म्हटले की, येथून दिसणारे सुंदर सूर्यास्त काही मिनिटांसाठी तरी त्यांना महागड्या भाड्याची चिंता विसरायला लावतात. त्यांनी हेही सांगितलं की हे अपार्टमेंट एमारच्या प्रीमियम निवासी प्रकल्पाचा भाग आहे. येथे राहणाऱ्या लोकांना अनेक प्रीमियम सुविधा मिळतात. त्यामध्ये स्विमिंग पूल, आधुनिक जिम, स्क्वॅश कोर्ट आणि संपूर्ण क्लस्टरमध्ये विविध सुविधा उपलब्ध आहेत. तसेच हे अपार्टमेंट “चिलर-फ्री” आहे, म्हणजे एअर कंडिशनिंगसाठी वेगळे अतिरिक्त पैसे द्यावे लागत नाहीत.

पोस्टच्या कॅप्शनमध्ये नितिका यांनी त्यांच्या नवीन घराबद्दल सांगितलं आहे. त्यांनी सांगितलं की काही काळापूर्वी हे त्यांच्यासाठी फक्त आणखी एक अपार्टमेंट होते, जे त्या पाहण्यासाठी गेल्या होत्या. मात्र अनेक ठिकाणं पाहून आणि तुलना करून अखेर हेच घर त्यांना सर्वात चांगलं वाटलं आणि त्यांनी ते आपलं नवीन घर बनवण्याचा निर्णय घेतला. नितिका यांनी लिहिलं की त्यांनी दुबईतील अनेक भागांमध्ये घरं पाहिली, पण या अपार्टमेंटमधील काही गोष्टींनी त्यांचं मन जिंकलं. मोठ्या खिडक्या, मरीनाचं सुंदर दृश्य, समुद्रकिनाऱ्यावर दिसणारं सूर्यास्त आणि घरभर येणारा भरपूर नैसर्गिक प्रकाश यामुळे त्यांना वाटलं की त्यांना हवी असलेली जागा हीच आहे.

त्यांनी पुढे सांगितलं की जेव्हा त्या येथे राहायला आल्या तेव्हा अपार्टमेंट पूर्णपणे सज्ज अवस्थेत होतं. घरात आवश्यक असलेली जवळपास प्रत्येक वस्तू आधीपासूनच उपलब्ध होती. इतकेच नव्हे तर त्यांना नवीन चमचे, कटलरी आणि कोस्टरही उघडावे लागले नाहीत. कालांतराने त्यांनी त्यांच्या जुन्या घरातील काही खास वस्तू येथे सजवल्या, ज्या त्या भारतातील गुरुग्राम येथून सोबत घेऊन आल्या होत्या. त्यांच्या मते काही वस्तू या केवळ सामान नसतात, तर त्यांच्याशी भावना जोडलेल्या असतात. त्यामुळे त्या मागे सोडणे सोपे नसते.

हा व्हिडिओ इंस्टाग्रामवर नितिका मेहता यांनी त्यांच्या @initikamehta या अकाउंटवरून शेअर केला आहे. हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होताच लोकांनी त्यावर विविध प्रतिक्रिया द्यायला सुरुवात केली. काहींचे मत आहे की हे भाडे खूप जास्त आहे आणि एवढ्या पैशांत इतर अनेक ठिकाणी मोठे घर मिळू शकते. तर दुसरीकडे काही वापरकर्त्यांनी म्हटले की दुबईसारख्या ठिकाणी अशी लोकेशन, अप्रतिम दृश्य, आलिशान सुविधा आणि पूर्णपणे सुसज्ज अपार्टमेंट मिळत असेल तर हे भाडे योग्यच आहे.