Viral Video Kalyan: सध्या सोशल मीडियावर भारतीय रेल्वे संदर्भात एक नवीन वाद चांगलाच चर्चेत आहे. प्रश्न असा विचारला जात आहे की, ट्रेन उशिरा आल्याची शिक्षा सामान्य प्रवाशांनीच का भोगायची? महाराष्ट्रातील कल्याण जंक्शन येथे घडलेल्या एका घटनेमुळे रेल्वेच्या नियमांवर इंटरनेटवर मोठी चर्चा सुरू झाली आहे.

बिहारमधील आदित्य चौहान हे आपल्या कुटुंबाला कल्याण स्टेशनवर सोडण्यासाठी आले होते. दुपारी १२ वाजता ट्रेन होती. सुरुवातीला ट्रेन २ तास उशिरा असल्याचे सांगण्यात आले, पण नंतर ती तब्बल ५ तास उशिरा झाली. अशा परिस्थितीत कुटुंबाला एकटे सोडणे शक्य नसल्याने आदित्य स्टेशनवरच थांबले. त्याचवेळी एका टिसीने (TC) त्यांच्याकडे प्लॅटफॉर्म तिकीट मागितले. आदित्यने यांनी तिकीट दाखवले. मात्र TC म्हणाला की हे तिकीट आता वैध नाही, कारण प्लॅटफॉर्म तिकीट फक्त २ तासांसाठीच वैध असते. त्यामुळे तुम्हाला नवीन तिकीट घ्यायला हवे होते. अखेर नियमांचा आधार घेत TC ने आदित्यकडून ५०० रुपयांचा दंड वसूल केला.

चूक कोणाची; रेल्वेची की प्रवाशाची?

या घटनेमुळे संतापलेल्या आदित्यने संपूर्ण प्रकाराचा व्हिडिओ आणि दंडाची पावती आपल्या इंस्टाग्राम अकाउंट @adityasinghchauhan01 वर शेअर केला. हा व्हिडिओ आता सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. त्याने रेल्वेला प्रश्न विचारला की, ५०० रुपये काही मोफत मिळत नाहीत. ट्रेन रेल्वेमुळे उशिरा आली, मग दंड मी का भरायचा? व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर रेल्वेची चूक की प्रवाशाची, यावर इंटरनेटवर जोरदार चर्चा सुरू झाली.

कायद्याच्या दृष्टीने पाहिले तर TC आपल्या जागी योग्य होता. रेल्वेच्या नियमांनुसार प्लॅटफॉर्म तिकीट फक्त २ तासांसाठीच वैध असते. त्यानंतर नवीन तिकीट घ्यावे लागते किंवा प्लॅटफॉर्म सोडावा लागतो. त्यामुळे TC ने आपल्या कर्तव्यानुसारच कारवाई केली.

इंटरनेटवर लोकांचा संताप

मात्र सोशल मीडियावरील अनेक लोक नैतिकदृष्ट्या प्रवाशाच्या बाजूने उभे आहेत. त्यांचे म्हणणे आहे की, ट्रेन रेल्वेमुळे ५ तास उशिरा झाली असेल तर कोणताही व्यक्ती आपल्या कुटुंबाला स्टेशनवर एकटे सोडून बाहेर जाऊ शकत नाही. अनेकांनी नाराजी व्यक्त करत म्हटले की, चूक रेल्वेची असेल तर त्याचा फटका सामान्य लोकांना का बसावा?

लोक असा प्रश्नही विचारत आहेत की, प्लॅटफॉर्म तिकीटाची मुदत संपताच रेल्वे लगेच दंड आकारू शकते, मग ट्रेन अनेक तास उशिरा झाल्यावर प्रवाशांना नुकसानभरपाई किंवा परतावा तितक्याच तत्परतेने का दिला जात नाही? अनेक नेटिझन्सनी अशा प्रकरणांमध्ये रेल्वेने आपल्या नियमांमध्ये तातडीने बदल करावेत, अशी मागणी केली आहे.