Viral Video: सोशल मीडियावर दररोज असंख्य व्हिडिओ व्हायरल होत असतात. यातले काही व्हिडीओ लोकांना आश्चर्यचकित करतात आणि काही व्हिडीओ पाहून माणूसकी संपत चाललीय की काय असंच वाटू लागतं. यासोबतच स्त्रियांबरोबर घडणाऱ्या वाईट घटना यांच्याही समावेश आहेच. सध्या अशीच काहीशी विचित्र घटना दिल्लीत घडलीय, ज्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होतोय. नेमकं काय घडलंय या व्हिडीओमध्ये, जाणून घेऊ या…

व्हायरल व्हिडीओ

दिल्लीतील रोहिणी सेक्टर १८–१९ परिसरातून महिलांच्या सुरक्षेशी संबंधित एक घटना समोर आली आहे. एका तरुणीने व्हिडिओ पोस्ट करून याबद्दल खुलासा केलं आहे. तरुणीने व्हिडीओमध्ये सांगितलं की, रोड रेजच्या घटनेदरम्यान तिच्या उबर बाईक टॅक्सी चालकाला दुसऱ्या व्यक्तीने मारहाण केली.

व्हिडिओमध्ये तरुणीने सांगितलं की, ती एका शूटवरून परतत होती आणि तिला मेट्रो स्टेशनला जायचं होतं. यासाठी तिने उबर बाईक टॅक्सी बुक केली होती. त्यानंतर उबर बाईकची दुसऱ्या मोटरसायकलशी धडक झाली.

तिच्या म्हणण्यानुसार, दोन्ही चालकांची काही प्रमाणात चूक होती, पण हा वाद बोलून सोडवता आला असता. मात्र, दुसऱ्या बाईकवरील व्यक्ती खाली उतरली आणि तिने उबर चालकाला मारहाण केली, असा दावा त्या तरुणीने व्हिडिओमध्ये केला आहे.

विशेष म्हणजे, व्हिडिओच्या सुरुवातीलाच संबंधित व्यक्ती हेल्मेट उचलून उबर चालकाच्या डोक्यावर जोरात मारताना दिसते. तरुणीचा दावा आहे की, हेल्मेट तुटल्यानंतर त्याचे तुकडे तिच्यावर उडाले आणि त्यामुळे तिलाही दुखापत झाली.

सोशल मीडियावर व्हायरल झालेला हा व्हिडीओ @gharkekalesh या एक्स अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे. तर “दिल्लीच्या रोहिणी सेक्टरमध्ये एका किरकोळ धक्क्यावरून उबर बाईक चालकावर हेल्मेटने निर्घृणपणे हल्ला करण्यात आला. हल्लेखोराने (बाईक DL11PH6197) त्यांना शिवीगाळ केली आणि तो पळून गेला. ही संपूर्ण घटना एका महिला प्रवाशाने रेकॉर्ड केली.” अशी कॅप्शन व्हिडीओला देण्यात आली आहे. व्हिडीओ व्हायरल होताच अनेकांनी यावर संतप्त प्रतिक्रिया दिल्या आहेत.

युजर्सच्या प्रतिक्रिया

या धक्कादायक घटनेचा व्हिडीओ व्हायरल झाल्यावर अनेकांनी आपल्या प्रतिक्रिया दिल्या. एका युजरने कमेंट करत लिहिलं, “तो गरीब आहे आणि आपलं काम करतो म्हणून कोणालाही त्याच्याशी असं वागण्याचा अधिकार नाही. हल्लेखोरावर कठोर कारवाई झाली पाहिजे. ज्या प्रकारे त्याने उबर ड्रायव्हरला हेल्मेटने मारलं ते अत्यंत चुकीचे आहे.” असं एका युजरने लिहिलं. तर दुसऱ्याने “तिला स्वतःला इजा होण्याची जास्त काळजी आहे, डोक्यात इतका जोरदार फटका बसलेल्या त्या बिचाऱ्या माणसाची तिला काहीच चिंता नाही. त्याला फटका बसल्यावर तिची पहिली प्रतिक्रिया होती, मी बसली आहे मागे…” अशी कमेंट केली.

दरम्यान, ही घटना नेमकी कधी घडली याची माहिती अद्याप समोर आलेली नाही. तसंच, या व्हिडिओवर उबरकडूनही अद्याप कोणतीही सार्वजनिक प्रतिक्रिया देण्यात आलेली नाही.