Viral Video: बगहा येथील एका घरात अचानक असं दृश्य दिसलं की, ते पाहून सगळ्यांची धडधड वाढली. घराच्या अंगणात दोन प्राणी समोरासमोर आले होते, ज्यांचा सामना जंगलातही क्वचितच पाहायला मिळतो. एका बाजूला जगातील सर्वात लांब विषारी साप किंग कोब्रा, तर दुसऱ्या बाजूला आपल्या जबरदस्त विळख्यासाठी ओळखला जाणारा विशाल अजगर होता.

काही क्षणांसाठी असं वाटत होतं की घराचं अंगणच जंगलात बदललं आहे. दोन्ही साप एकमेकांसमोर उभे होते. घरातील लोक लगेच बाहेर आले आणि काही वेळातच ही बातमी संपूर्ण परिसरात पसरली. पाहता पाहता गावकऱ्यांची मोठी गर्दी जमली. प्रत्येकाच्या मनात एकच प्रश्न होता- जर हे दोघे भिडले तर काय होईल?

ही घटना वाल्मिकीनगर टायगर रिझर्व्हमधील गोनौली वनक्षेत्रातील आहे. वनपरिक्षेत्र कार्यालयासमोर राहणारे नितेश कुमार यांच्या घराच्या अंगणात अचानक आधी एक साप दिसला. घरच्यांना काही समजण्याआधीच दुसराही मोठा साप तिथे आला. दोघेही वेगवेगळ्या दिशेने आले आणि समोरासमोर थांबले. प्रत्यक्षदर्शींनी सांगितलं की, काही वेळ दोघांची हालचाल अशी होती की, कोणत्याही क्षणी त्यांच्यात झुंज सुरू होईल असं वाटत होतं. त्यामुळे घरच्यांनी कोणताही धोका न पत्करता तात्काळ घर रिकामं केलं आणि वन विभागाला माहिती दिली.

घराबाहेर जमली मोठी गर्दी

घटनेची माहिती मिळताच परिसरातील लोकही तिथे पोहोचले. काही जण सुरक्षित अंतरावरून हा दुर्मीळ प्रकार पाहत होते, तर अनेकजण मोबाईलवर व्हिडीओ शूट करत होते. मात्र, किंग कोब्रा हा अतिशय विषारी साप असल्यामुळे वन विभागाने लोकांना सतत सुरक्षित अंतर राखण्याचं आवाहन केलं. गर्दी वाढल्याने बचाव मोहिमही अधिक कठीण झाली.

माहिती मिळताच प्रशिक्षित साप पकडणारे मुरारी कुमार घटनास्थळी पोहोचले. त्यांनी सर्वप्रथम लोकांना सुरक्षित अंतरावर हटवलं. त्यानंतर दोन्ही सापांच्या हालचालींवर बारकाईने लक्ष ठेवण्यात आलं. ही बचाव मोहीम सोपी नव्हती.

दोन्ही साप सक्रिय होते आणि थोडीशी चूकही मोठा अपघात घडवू शकली असती. बराच प्रयत्न केल्यानंतर आधी एका सापाला सुरक्षितपणे पकडण्यात आलं. त्यानंतर दुसऱ्या सापालाही ताब्यात घेण्यात यश आलं. वन विभागाने दोन्ही सापांना कोणतीही इजा न करता त्यांच्या नैसर्गिक अधिवासात म्हणजेच जंगलात सोडून दिलं. बचाव मोहीम पूर्ण झाल्यानंतर घरच्यांसह स्थानिकांनी सुटकेचा निश्वास सोडला.

दोन वर्षांपूर्वीही याच घरात सापडला होता किंग कोब्रा

या घटनेमुळे लोक अधिकच आश्चर्यचकित झाले, कारण ही पहिलीच वेळ नव्हती. सुमारे दोन वर्षांपूर्वीही याच घराच्या परिसरातून एका मोठ्या किंग कोब्राला सुरक्षितपणे पकडण्यात आलं होतं. आता पुन्हा त्याच घरात किंग कोब्रा आणि अजगर एकाच वेळी दिसल्याने संपूर्ण परिसरात याची चर्चा सुरू झाली आहे.

google trends

स्थानिकांचं म्हणणं आहे की, जंगलालगतच्या भागात साप अनेकदा दिसतात. मात्र किंग कोब्रा आणि अजगर एकमेकांसमोर उभे राहणं ही अत्यंत दुर्मीळ घटना आहे.