Python Snake Viral Video: अजगराचं नाव घेतलं तर आपल्यापैकी अनेकांना घाम फुटतो आणि अशा अजगराच्या समोर तुम्ही कधी आलात तर त्यावेळी तुमची अवस्था काय होईल? नक्कीच यावेळी तुम्हाला भीती वाटेल यात शंका नाही. कारण अजगर हा एक अतिशय धोकादायक सरपटणारा प्राणी आहे. शिवाय त्याच्यामध्ये माणसांसह इतर प्राण्यांना जिवंत गिळण्याची ताकद आहे. अजगराने एखाद्याला पकडले की त्याच्यापासून सुटका करणं अशक्य असतं. अजगर अनेक जंगलात किंवा त्यालगतच्या रस्त्यांवर, वस्त्यांच्या जवळपास दिसू शकतो.

सध्या सोशल मीडियावर एक असा व्हिडीओ व्हायरल होत आहे, ज्यात अजगर चक्क मुंबई लोकलमध्ये दिसला आहे. नेमकं काय घडलंय, जाणून घेऊ या…

ट्रेनच्या इंजिनमध्ये शांतता आणि आरामदायी वातावरण असणे गरजेचे असते. त्यामुळे ट्रेन चालवणारे कर्मचारी निवांतपणे आपले काम करू शकतात. पण जर तिथेच धोका असेल तर ट्रेन कशी चालणार? मुंबईत एका ट्रेनच्या इंजिनमध्ये असाच एक प्रकार घडला आहे. मुंबई लोकलच्या इंजिनजवळ एक अजगर आढळला. तो आकाराने लहान होता, पण साप असल्याने सर्वांचीच धावपळ उडाली. त्याला पाहिल्यानंतर आणि त्याचं रेस्क्यू केल्यानंतरचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर खूप व्हायरल होत आहे.

मध्यरात्री आढळला अजगर

मुंबईच्या छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथे मंगळवारी हा अजगर आढळला. त्यावेळी मध्यरात्र झाली होती. रेल्वे कर्मचाऱ्यांच्या नजरेस तो पडताच त्यांची घाबरगुंडी उडाली. त्यानंतर तातडीने प्रशिक्षित रेस्क्यूअरला बोलावण्यात आले आणि परिस्थिती नियंत्रणात आणण्यात आली.

त्वरित करण्यात आले रेस्क्यू

या अजगराचे काही वेळातच रेस्क्यू करण्यात आले. त्यावेळी रात्रीचे १.४० वाजले होते. व्हायरल व्हिडिओमध्ये सापाला थोड्या प्रयत्नांनंतर एका डब्यात बंद करताना दिसत आहे. येथे दोन व्हिडिओ पाहता येतात.

ट्रेनमध्ये कसा पोहोचला?

मान्सूनच्या काळात साप कोरड्या जागेच्या शोधात बाहेर पडतात. त्यामुळे अशा घटना घडण्याची शक्यता वाढते, असे मानले जात आहे. अजगर हा भारतीय वन्यजीव संरक्षण कायद्याअंतर्गत संरक्षित प्राणी आहे. मात्र हा साप विषारी नसतो. आढळलेला साप हा ब्लॅक रॉक पायथनचा पिल्लू होता. त्यामुळे त्याची लांबी फार मोठी नव्हती. या प्रजातीच्या अजगराची कमाल लांबी सुमारे १९ फूटांपर्यंत नोंदवली गेली आहे.