Viral Video: उत्तर प्रदेशातील बरेली येथील एक धक्कादायक आणि अस्वस्थ करणारा व्हिडिओ सोशल मीडियावर सध्या मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. या व्हिडीओची चर्चा सध्या सर्वत्र सुरू आहे. व्हिडीओ पाहून तुम्हीच सांगा कोण बरोबर कोण चूक…
व्हायरल व्हिडीओ
सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या या व्हिडिओमध्ये एका रेशन दुकानाबाहेर एक महिला दुसऱ्या महिलेला वारंवार कानाखाली मारताना दिसत आहे. हा व्हिडिओ ‘@gharkekalesh’ या एक्स अकाउंटवरून युजरने शेअर केला असून, ₹१,२०० उधारीवरून हा वाद झाला असल्याचा दावा करण्यात आला आहे.
व्हिडिओमध्ये आपण पाहू शकतो की, एक महिला दुसऱ्या महिलेला सतत कानाखाली मारताना दिसत आहे, तर दुकानाच्या काउंटरवर उभा असलेला एक पुरुष शांतपणे हे सगळं पाहताना दिसतो आहे. ज्या महिलेला मारलं जात आहे, ती महिला तिथेच उभी राहून मार सहन करताना दिसते आणि ती स्वतःचा बचाव करण्याचाही प्रयत्न करत नाही.
या व्हिडिओकडे काँग्रेस पक्षाच्या राष्ट्रीय प्रवक्त्या सुप्रिया श्रीनेत यांचंही लक्ष गेलं आहे. त्यांनी हा व्हिडीओ रिपोस्ट करत लिहिलं, “उत्तर प्रदेशातील बरेलीमध्ये एका गरीब महिलेने एका श्रीमंत महिलेकडून १२०० रुपये उसने घेतले होते. ती ते पैसे परत देऊ शकली नाही. त्यामुळे त्या श्रीमंत महिलेने तिला पाच वेळा कानाखाली मारली आणि म्हणाली, ‘१२०० रुपयांचे रेशन घेऊन खाते आणि पैसे परत देण्यासाठी इथे-तिथे फिरते.’ पण याचा अर्थ असा नाही की पैशांच्या जोरावर कोणीही एखाद्याला मारहाण करू शकतं.”
हा व्हिडिओ पोस्ट झाल्यानंतर अवघ्या २४ तासांच्या आत याला १,७५,७०० पेक्षा जास्त व्ह्यूज आले आहेत. या घटनेची नेमकी तारीख समोर आलेली नाही. पण व्हिडीओ व्हायरल होताच अनेकांनी यावर आपल्या प्रतिक्रिया दिल्या.
युजर्सच्या प्रतिक्रिया
सोशल मीडियावर व्हिडीओ व्हायरल होताच अनेकांनी यावर प्रतिक्रिया देत आपलं मत मांडलं आहे. एका युजरने कमेंट करत लिहिलं, “आजकाल कायद्याची भीती नसल्यामुळे अशा लोकांची संख्या वाढत आहे.”, तर दुसऱ्याने कमेंट करत लिहिलं, “लोक इतके कठोर कसे होतात?”, तर तिसऱ्याने “जिला तुम्ही श्रीमंत म्हणता, ती बाईसुद्धा उदरनिर्वाहासाठी किराणा दुकान चालवते… आजकाल हीच सर्वात मोठी गोष्ट आहे: आधी माल उधारीवर द्यायचा आणि मग पैसे मागायचे, पण कोणीच पैसे द्यायला तयार नसतं तेव्हा काय करायचं… ” अशी कमेंट केली.
