Russian girls on border 2 song: सोशल मीडियाच्या युगात दररोज असंख्य व्हिडीओ व्हायरल होत असतात; पण काही व्हिडीओ असे असतात, जे केवळ मनोरंजनापुरते मर्यादित राहत नाहीत, तर ते थेट मनाला स्पर्श करतात. देशभक्ती, भावना व कला यांचा सुंदर संगम जेव्हा दिसतो, तेव्हा तो व्हिडीओ प्रेक्षकांच्या कायमचा लक्षात राहतो. सध्या असाच एक व्हिडीओ चर्चेत आहे, जो पाहणाऱ्यांना थांबून विचार करायला भाग पाडतो.
या व्हिडीओमध्ये कोणताही गाजावाजा नाही, ना दिखावूपणा आहे, तरीही तो प्रचंड वेगाने लोकांच्या मनात घर करत आहे. सीमारेषा, भाषा व देश यापलीकडे जाऊन भावना कशा एकत्र येतात, हे दाखवणारा हा व्हिडीओ अनेकांसाठी खास ठरत आहे. त्यामुळेच हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर चर्चेचा विषय बनला आहे.
या व्हायरल व्हिडीओमध्ये एक रशियन मुलगी ‘बॉर्डर २’ चित्रपटातील लोकप्रिय देशभक्तीपर गीत ‘घर कब आओगे’ यावर डान्स करताना पाहायला मिळते. तिने भारतीय सैन्यासारखा पोशाख परिधान केला असून, तिच्या मागे टीव्ही स्क्रीनवर तेच गाणे सुरू आहे. तिचा डान्स केवळ स्टेप्सपुरता मर्यादित नसून, त्या गाण्याच्या भावनेशी पूर्णपणे जोडलेला आहे.
तिचे हावभाव, चेहऱ्यावरील गंभीर भाव आणि हालचाली पाहता, त्या गाण्यातील प्रत्येक ओळ ती मनापासून अनुभवत असल्याचे जाणवते. सोशल मीडियावर ही मुलगी रशियन असल्याचे सांगितले जात आहे; मात्र त्याबाबतची अधिकृत माहिती उपलब्ध नाही. तरीसुद्धा या व्हिडीओमधून भारतीय सैनिकांप्रति आदर आणि संवेदनशीलता स्पष्टपणे दिसून येते. हा व्हिडीओ ट्विटर या प्लॅटफॉर्मवर Awarapan 2 नावाच्या अकाउंटवरून शेअर करण्यात आला असून, काही वेळातच हजारो लोकांनी तो पाहिला आणि शेअर केला.
पाहा व्हिडीओ
या व्हिडीओखाली सोशल मीडियावर प्रचंड सकारात्मक प्रतिक्रिया आल्या आहेत. अनेक युजर्सनी या डान्सला भारतीय सैन्याप्रती एक भावनिक श्रद्धांजली असल्याचे म्हटले आहे. काहींनी “देशभक्ती ही फक्त देशापुरती मर्यादित नसते” अशी प्रतिक्रिया दिली आहे, तर काहींनी या मुलीच्या भावनांचे मनापासून कौतुक केले आहे. या मुलीने नृत्याद्वारे घोषणांपेक्षा भावनिक आणि शांत भाव ठेवून देशभक्ती मांडल्यामुळे हा व्हिडीओ अधिक प्रभावी वाटतो, असेही अनेकांचे मत आहे.
सैनिकांनी घरी परत यावे ही त्यांच्या कुटुंबीयांची आस, त्यांच्या कुटुंबीयांच्या दाटून आलेल्या भावना आणि त्याग या सगळ्यांचे प्रतिबिंब या डान्समधून दिसते. हा व्हिडीओ फक्त एक डान्स क्लिप न राहता, ती कला आणि भावना या सीमा ओलांडू पाहतेय, हे अधोरेखित करतो. कदाचित याच कारणामुळे हा व्हिडीओ लोकांच्या मनाला भिडत असून, तो मोठ्या प्रमाणात शेअर केला जात आहे.

