Tailor Income Viral Video: भारतात एका टेलरची किती कमाई होत असेल? साहजिकच अनेक जण म्हणतील की टेलरला फारशी कमाई होत नाही. त्यामुळे भारतात टेलरिंगच्या कामाकडे फारसं गांभीर्याने पाहिलं जात नाही. मात्र हेच काम अमेरिकेत केलं तर टेलरची कमाई ऐकून तुम्ही थक्क व्हाल.

अमेरिकेत राहणाऱ्या एका महिलेने याबाबत व्हिडिओ शेअर करत सविस्तर हिशोब मांडला आणि अमेरिकेत टेलर किती कमावतो हे सांगितलं.

एका तासात टेलरची इतकी कमाई

या महिलेचं नाव कोमल पांडे आहे. तिने हा व्हिडिओ तिच्या इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे. व्हायरल व्हिडिओमध्ये तिने सांगितलं की अमेरिकेत टेलर म्हणून काम केल्यास एका तासाला सुमारे २५ डॉलर कमावता येतात. आजच्या दरानुसार हे भारतीय चलनात जवळपास २२०० ते २३०० रुपये होतात. या हिशोबाने एखादा टेलर रोज ८ तास काम करत असेल तर तो दिवसाला १५ ते १८ हजार रुपये कमवू शकतो.

कपड्यांमधील छोट्या कामांसाठीही मिळतात चांगले पैसे

टेलरिंगमध्ये फक्त कपडे शिवण्याचंच काम नसतं, तर कपड्यांमध्ये छोटे-मोठे बदल करण्यासाठीही चांगले पैसे मिळतात. उदाहरणार्थ, एखाद्या कपड्याचं फक्त अल्टरेशन केल्यास त्यासाठी सुमारे ४० डॉलर म्हणजेच जवळपास ३५०० ते ४००० रुपये मिळू शकतात.

महिलेने व्हिडिओमध्ये पुढे सांगितलं की भारतात याच कामासाठी साधारण १०० ते ५०० रुपये मिळतात, तर अमेरिकेत त्याची किंमत अनेक पटींनी जास्त असते. तिथे टेलरिंगला एक व्यावसायिक कौशल्य मानलं जातं आणि चांगल्या टेलरची नेहमीच गरज असते, विशेषतः लग्नसमारंभ, ऑफिस आणि डिझायनर कपड्यांसाठी.

इन्स्टाग्रामवर व्हायरल झालेला हा व्हिडीओ @neha_in_usa या अकाउंटवरून शेअर करण्यात आला असून याला १.७ मिलियन व्ह्युज आले आहेत. तर “अमेरिकेत टेलर किती कमावतात” अशी कॅप्शन व्हिडीओला देण्यात आली आहे. व्हिडीओ व्हायरल होताच अनेकांनी यावर भरभरून प्रतिक्रिया दिल्या आहेत.

महिलेच्या व्हिडिओवर लोकांच्या प्रतिक्रिया

हा व्हिडिओ पाहता पाहता व्हायरल झाला. तो पाहिल्यानंतर अनेकांनी आपापल्या प्रतिक्रिया दिल्या. काही लोकांचं म्हणणं आहे की भारतात चांगल्या टेलरलाही त्यांच्या कामाच्या मानाने इतके पैसे मिळत नाहीत. तर काहींनी कमेंट करत सांगितलं की अमेरिकेत केवळ टेलरिंगच नाही, तर इतर अनेक कामांसाठीही चांगला मोबदला मिळतो.