Viral Video: आसाममधील कामाख्या रेल्वे स्थानकावर एका महिलेसोबत गैरवर्तन झाल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. एका व्यक्तीने वारंवार तिच्याकडे पाहत अश्लील कमेंट्स केल्या आणि आक्षेपार्ह हावभाव केल्याचा आरोप महिलेने केला आहे. या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर करण्यात आला असून, त्यावरून संताप व्यक्त केला जात आहे.
FPJ च्या वृत्तानुसार या महिलेचे नाव गुनगुन दत्ता असल्याचे सांगण्यात येत आहे. त्या एका नातेवाईकाला रेल्वेने सोडण्यासाठी कामाख्या रेल्वे स्थानकावर गेल्या होत्या. ट्रेनची वाट पाहत असताना जवळच असलेला एक व्यक्ती वारंवार त्यांच्याकडे पाहत असल्याचे त्यांच्या लक्षात आले. तसेच तो काही कमेंट्सही करत असल्याचा दावा त्यांनी केला.
सततच्या या प्रकारामुळे अस्वस्थ झाल्यानंतर गुनगुन यांनी संबंधित व्यक्तीचा मोबाईलमध्ये व्हिडीओ काढण्यास सुरुवात केली. त्यांना मोबाईलने रेकॉर्ड करताना पाहताच ती व्यक्ती तिथून निघून गेली.
ट्रेन येताच पुन्हा स्थानकावर आल्याचा दावा (Viral Video)
गुनगुन यांच्या म्हणण्यानुसार, ट्रेन स्थानकावर आल्यानंतर ती व्यक्ती पुन्हा तिथे आली. त्यांनी त्यावेळीही त्याचा व्हिडीओ रेकॉर्ड केला. व्हिडीओमध्ये संबंधित व्यक्ती प्लॅटफॉर्मवर उभी असल्याचे दिसत असून, महिला ट्रेनच्या खिडकीतून त्याचा व्हिडीओ काढताना दिसत आहे.
महिलेच्या आरोपानुसार, संबंधित व्यक्तीने तिच्याकडे पाहत आक्षेपार्ह हावभाव केले. व्हिडीओमध्ये ती व्यक्ती फोनवर बोलताना दिसत असून, काही वेळाने त्या व्यक्तीने त्याच्या पॅन्टच्या आत हात घातल्याचेही दिसत असल्याचा दावा करण्यात आला आहे.
सोशल मीडियावर संताप (Abuse Viral Video)
या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर झाल्यानंतर अनेकांनी संताप व्यक्त केला. काही युजर्सनी रेल्वे प्रशासन, आसाम पोलीस आणि संबंधित अधिकाऱ्यांना टॅग करत या प्रकरणाची चौकशी करून कारवाई करण्याची मागणी केली.
महिलांनी अशा प्रकारच्या घटनांना घाबरून गप्प न राहता तातडीने रेल्वे कर्मचारी, स्टेशन मास्तर किंवा रेल्वे पोलिसांशी संपर्क साधावा, असा सल्लाही काही युजर्सनी दिला. दरम्यान, या घटनेनंतर सार्वजनिक ठिकाणी महिलांच्या सुरक्षेचा मुद्दा पुन्हा चर्चेत आला आहे.
