Mumbai Local Video: मुंबईकरांची जीवनवाहिनी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मुंबई लोकलमधून दररोज लाखो लोक प्रवास करत असतात. आपल्या स्वप्नपूर्तीसाठी ठिकठिकाणाहून लोक मुंबईत येतात आणि मुंबईचेच होऊन जातात. या धकाधकीच्या जीवनात दर दिवशी लोकलमध्ये काहीतरी नवीन पाहायला मिळतं. दररोज सकाळी कामावर जाणाऱ्यांची लगबग आणि धक्काबुक्की करत ‘अंदर बहुत जगा है’ असं म्हणत मुंबई लोकलमध्ये दर दिवशी असंख्य माणसांची गर्दी पाहायला मिळते. या गर्दीत अनेकदा महिलांची मात्र गैरसोय होते.

जेव्हा महिलांना कामावर लवकर पोहोचायचं असतं किंवा त्यांना कामावरून यायला उशी होणार असतो, तेव्हा त्यांच्या सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण होतो, याच कारणाने अनेक महिला पहाटे लवकर आणि उशीरा रात्री प्रवास करणं टाळतात. तसंच अनेकदा पहाटे आणि रात्रीच्या वेळी महिलांच्या डब्यात पुरूषही प्रवास करतात. अनेकदा तर डबा रिकामीच असतो. आणि अशावेळी एकटीने प्रवास करण्याची भीती कोणालाही सहज वाटू शकते. सध्या असाच एक अनुभव एका महिलेला आला आहे आणि तिने याचा व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला आहे, जो सध्या चर्चेचा विषय बनला आहे.

व्हायरल व्हिडीओ (Woman Local Train Viral Video)

सोशल मीडियावर व्हिडीओ व्हायरल होताच सगळीकडे याची चर्चा सुरू आहे. या व्हिडीओत महिला म्हणते “आता सकाळचे ५:३० वाजलेत आणि मी वसईला जाणारी ट्रेन पकडली आहे . ट्रेनमध्ये खूप कमी लोक आहेत आणि मी डब्यात एकटीच आहे. हे इतकं भयानक आहे, मी खूप घाबरले आहे पण मी माझं सेफ्टी कॅरी केलं आहे आणि हे मी हातातंच ठेवलंय कारण आत्ताच नायगाव स्टेशनला एक पुरूष चढला आणि दुसऱ्या बाजूने तो उतरून गेला आणि तो इतक्या विचित्र नजरेने मला बघत होतो म्हणून मी हे हातातच ठेवलंय. आपल्याला माहित नसतं की कोणत्या वेळी कोण आपल्यावर हल्ला करेल. मुलींनो प्लीज एकट्या प्रवास करताना हे सेफ्टी पेपर स्प्रे कॅरी करा.”

सोशल मीडियावर व्हायरल झालेला हा व्हिडीओ @neelambandal या इन्स्टाग्राम अकाउंटवरून शेअर करण्यात आला असून याला तब्बल २.५ मिलियनपेक्षा जास्त व्ह्यूज आले आहेत. तसंच “महिलांची सुरक्षा आधी, Women’s safety first” अशी कॅप्शन व्हिडीओला देण्यात आली आहे.

युजर्सच्या प्रतिक्रिया

सोशल मीडियावर हा व्हिडीओ व्हायरल होताच अनेकांनी यावर आपल्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका युजरने कमेंट करत लिहिलं, “प्रवासात स्वतःची काळजी घेत जा आणि वेळ आली लढायला पण घाबरू नका कारण तुम्ही महाराष्ट्रात आहात छत्रपती शिवाजी महाराजांच्या महाराष्ट्रात”, तर दुसऱ्याने “वाघीण असावी तर अशी, मुंबईत कुणाच्याच भरवशावर राहायचं नाही.” अशी कमेंट केली. तर एकजण सल्ला देत म्हणाला, “अशा वेळी लेडीज डब्यामध्ये न बसता पुरुषांच्या डब्यात बसायचं काही हरकत नाही.” तर एकाने “अगदी बरोबर आहे ताई स्वतःची काळजी घेणं गरजेचं आहे. छान मेसेज दिला तू” अशी कमेंट केली.