Viral Video: दिल्लीसारख्या महागड्या शहरात, जिथे अनेक नोकरी करणारे लोक वाढत्या खर्चामुळे चिंतेत असतात, तिथे एका तरुणीचा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे. ही तरुणी सरकारी नोकरी करते आणि तिने तिच्या महिन्याच्या खर्चाबाबत दिलेली माहिती पाहून अनेक जण आश्चर्यचकित झाले आहेत.
महिन्याला ९० हजार रुपये पगार (Government Employee Viral Video)
कृतिका नावाच्या या तरुणीने सांगितले की, ती केंद्र सरकारमध्ये ASO (Assistant Section Officer) पदावर काम करते. तिला दरमहा सुमारे ९० हजार रुपये पगार मिळतो. मात्र, एवढा चांगला पगार असूनही तिचा मासिक खर्च फक्त २५ हजार रुपयांच्या आसपास आहे. खर्च आणि बचत यांचा समतोल कसा साधायचा, यामुळेच तिची सध्या सोशल मीडियावर चर्चा होत आहे.
कृतिकाने सांगितले की, तिने २०२२ मध्ये SSC CGL परीक्षा उत्तीर्ण केली आणि त्यानंतर तिला ही सरकारी नोकरी मिळाली. दिल्लीत राहत असूनही तिने खर्चावर चांगले नियंत्रण ठेवले आहे. ती एकटी राहण्याऐवजी एका मैत्रिणीसोबत 2BHK फ्लॅट शेअर करते. त्यामुळे घरभाडे, वीज, पाणी आणि इतर घरगुती खर्च कमी होतात.
तिच्या वाट्याचे घरभाडे दरमहा सुमारे ११,५०० रुपये येते. दिल्लीसारख्या शहरात हा खर्च तुलनेने कमी असल्याचे ती सांगते. तसेच, स्वयंपाकासाठी तिने एक मदतनीस (मेड) ठेवली आहे. त्या मेडला दरमहा ५ हजार रुपये दिले जातात, त्यातील कृतिकाचा वाटा सुमारे २,५०० रुपये असतो.
रोजच्या खर्चाचे नियोजन
घरातील किराणा आणि खाण्यापिण्याच्या वस्तूंसाठी ती Zepto आणि Blinkit सारख्या ऑनलाइन ॲप्सचा वापर करते. यावर तिचा दरमहा साधारण ४ ते ५ हजार रुपये खर्च होतो. मात्र, ती बाहेरचे अन्न कमी खाते आणि शक्यतो घरचेच जेवण पसंत करते. त्यामुळे तिचा खाण्याचा खर्च मर्यादित राहतो.
ऑफिसला जाण्यासाठी कृतिका स्कूटीचा वापर करते. त्यामुळे कॅब किंवा मेट्रोवरील खर्च वाचतो. तिचा महिन्याचा पेट्रोल खर्च सुमारे १,५०० रुपये आहे. तिच्या मते, स्कूटीमुळे वेळ आणि पैशांची दोन्ही बचत होते.
मनोरंजन आणि खरेदीतही बचत
मनोरंजनासाठी ती वेगवेगळ्या OTT प्लॅटफॉर्मचे स्वतंत्र सबस्क्रिप्शन घेण्याऐवजी मित्र आणि कुटुंबीयांसोबत अकाउंट शेअर करते. त्यामुळे अतिरिक्त खर्च टाळता येतो. बाहेर जेवणे किंवा ऑनलाइन फूड ऑर्डर करण्यासाठी ती महिन्याला जास्तीत जास्त २ हजार रुपये खर्च करते.
खरेदीबाबत बोलताना कृतिकाने सांगितले की, ती Nykaa आणि Myntra सारख्या वेबसाइट्सवरून महिन्याला सुमारे ३ ते ४ हजार रुपयांची खरेदी करते. मात्र, ती फक्त गरजेच्या वस्तूच खरेदी करते आणि अनावश्यक खर्च टाळते.
तिने हेही स्पष्ट केले की काही खर्च दर महिन्याला होत नाहीत. उदाहरणार्थ, मागील महिन्यात तिने प्रवास केला होता आणि नवीन गादीही खरेदी केली होती. पण हे एकदाच होणारे खर्च असल्याने तिने ते मासिक बजेटमध्ये समाविष्ट केले नाहीत.
हा व्हिडिओ इन्स्टाग्रामवरील @tweetikaa या अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे. कृतिकाचा हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. तिची बचत करण्याची सवय आणि साधी राहणी अनेकांना आवडली असून, अनेक जण तिचे कौतुक करत आहेत.
