आज भारत खूप वेगाने बदलतो आहे. चांगले रस्ते, स्वच्छ सार्वजनिक ठिकाणे आणि स्मार्ट सिटीसारख्या योजना प्रत्यक्षात दिसू लागल्या आहेत. सरकार स्वच्छतेसाठी मोठ्या प्रमाणावर पैसा खर्च करत आहे; पण या सगळ्यात एक प्रश्न सतत पडतो. आपण नागरिक म्हणून खरंच बदललो आहोत का? सार्वजनिक ठिकाणी कसं वागायचं, इतरांचा विचार कसा करायचा आणि आपली जबाबदारी काय आहे, याची जाणीव अजूनही अनेकांना नाही. रस्ते, बस, ट्रेन, स्टेशन ही सगळी ठिकाणं आपल्या सगळ्यांसाठी आहेत. तरीही काही लोकांचं वागणं पाहिलं की, सेन्स अजूनही कमीच आहे, असं वाटतं. अशाच एका घटनेमुळे सध्या सोशल मीडियावर नागरिक शिस्तीवर पुन्हा एकदा चर्चा सुरू झाली आहे.
सध्या सोशल मीडियावर, विशेषतः ट्विटरवर एक व्हिडीओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. हा व्हिडीओ एका ट्रेनच्या डब्यातील आहे. व्हिडीओमध्ये दिसते की, एक प्रवासी साइड लोअर बर्थवर आरामात बसून शेंगदाणे खात आहे; पण शेंगदाणे खाताना तो त्यांची सालं थेट खाली, स्वच्छ आणि नीटनेटक्या ट्रेनच्या फरशीवर टाकत आहे.
आसपास कचरा टाकण्यासाठी जागा उपलब्ध असतानाही किंवा साली एका कागदात गोळा करून ठेवता येऊ शकत असतानाही तो निष्काळजीपणे ट्रेन घाण करतो. काही क्षणांतच स्वच्छ डब्यामध्ये शेंगदाण्यांच्या सालींचा ढीग जमा होतो. हा व्हिडीओ पाहून अनेकांना संताप अनावर झाला. कारण- ही ट्रेन सामान्य नसून स्वच्छता राखण्यासाठी ओळखली जाणारी प्रीमियम किंवा चांगली सुविधा असणारी ट्रेन असल्याचेही सांगितले जात आहे.
पाहा व्हिडीओ
या व्हिडीओवर सोशल मीडियावर तीव्र प्रतिक्रिया आल्या आहेत. अनेक युजर्सनी त्या प्रवाशाच्या वर्तनावर टीका केली आहे. “इन्फ्रास्ट्रक्चर रातोरात बदलू शकतो; पण मानसिकता बदलायला वेळ लागतो,” अशी प्रतिक्रिया एका युजरने दिली. तर दुसऱ्याने लिहिले, “स्वच्छ भारत ही फक्त सरकारची जबाबदारी नाही, तर प्रत्येक नागरिकाची आहे.” काहींनी भारतीय रेल्वेने अशा प्रवाशांवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी केली.
तर, नियमांनुसार ट्रेन किंवा स्टेशन परिसरात कचरा फेकणे हा दंडनीय गुन्हा आहे. स्वच्छ भारत अभियानांतर्गत रेल्वे प्रशासन रुपये ५०० पर्यंत फाइन लागू शकतो, तर गंभीर प्रकरणात हा दंड पाच हजार रुपयांपर्यंत जाऊ शकतो. CCTV आणि AI कॅमेऱ्यांच्या मदतीने आता अशा घटनांवर नजर ठेवली जात आहे. हा व्हिडीओ केवळ एका प्रवाशाची चूक दाखवत नाही, तर आपल्या समाजातील सेन्सची स्थितीही उघड करून दाखवतो.

