Honest Uber Auto Driver Returns Extra Money Viral Video : आजच्या डिजिटल युगात अगदी छोट्या-मोठ्या व्यवहारांसाठीही अनेक जण गूगल पे, फोन पे, पेटीएम आणि इतर ऑनलाइन पेमेंट ॲपचा वापर करतात. काही सेकंदांत व्यवहार पूर्ण होत असल्याने ही सुविधा अत्यंत सोयीची ठरते. मात्र, घाईगडबडीत किंवा चुकून चुकीच्या व्यक्तीला पैसे पाठवणे, क्यूआर कोड स्कॅन न होणे किंवा अपेक्षेपेक्षा जास्त रक्कम ट्रान्सफर होणे अशा घटनाही अनेकदा घडतात. अशा वेळी तंत्रज्ञानापेक्षा समोरच्या व्यक्तीचा प्रामाणिकपणा आणि माणुसकी अधिक महत्त्वाची ठरते.

सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत असलेला एक व्हिडीओ याच गोष्टीची प्रचिती देतो. इन्स्टाग्रामवरील @ajmal_de या युजरने उबर ऑटोने प्रवास केला होता. प्रवास पूर्ण झाल्यानंतर त्याने गूगल पेद्वारे चालकाला १७२ रुपये पाठवले. मात्र, प्रत्यक्षात प्रवासाचे भाडे केवळ ७२ रुपये होते. घाईगडबडीत त्याच्याकडून १०० रुपये जास्त ट्रान्सफर झाले होते. रिक्षा निघून गेली आणि आपण घाईगडबडीत जास्तीचे पैसे दिलेत याबद्दल प्रवाशाला कल्पनाही नव्हती. मग २० मिनिटांनी गूगल पेवर उबर रिक्षा चालकाचा समोरून मेसेज आला.

त्याची रेटिंग सर्वकाही सांगत आहेत (Viral Video)

पैसे जास्त आल्याचे लक्षात येताच उबर रिक्षाचालकाने अतिरिक्त १०० रुपये तात्काळ प्रवाशाच्या खात्यात म्हणजेच गूगल पेवर परत पाठवले. इतकेच नाही, तर “भाडे फक्त ७२ रुपये होते” असा संदेशही त्याने पैसे पाठवताना लिहिला. या प्रामाणिक रिक्षाचालकाचे नाव शाजीर (Shajeer) असल्याचे व्हिडीओच्या स्क्रिनशॉटमध्ये दिसते आहे. तसेच, उबर ॲपवर त्याला ४.९७ स्टार रेटिंग असून, १५ वर्षांचा ड्रायव्हिंगचा अनुभव असल्याची माहितीही त्याने स्क्रिनशॉटद्वारे सगळ्यांना दिली आहे.

व्हिडीओ नक्की बघा…

सोशल मीडियावर व्हायरल होणारा हा व्हिडीओ @ajmal_de या इन्स्टाग्राम अकाउंटवरुन शेअर करण्यात आला आहे. या व्हिडीओतील घटना पाहिल्यानंतर अनेक नेटकरी संबंधित व्यक्तीच्या प्रामाणिकपणाचे आणि संवेदनशीलतेचे कौतुक करत “म्हणूनच त्याला उबर ॲपवर त्याला ४.९७ स्टार रेटिंग आहे”, “त्याची उबर रेटिंग सर्वकाही सांगून जाते आहे”, “अशा प्रामाणीकपणासह तो आयुष्यात खूप पुढे जाईल” ; आदी अनेकविध कमेंट्स नेटकऱ्यांनी व्हिडीओखाली केलेल्या दिसून आल्या आहेत…