Passenger Shows fake Water Bottle Viral Video : प्रवासाला निघताना अनेक जण घरातूनच पाण्याची बाटली, सॅनिटायझर, स्नॅक्स आणि इतर आवश्यक वस्तू सोबत घेतात. कारण बाहेर मिळणाऱ्या प्रत्येक वस्तूच्या दर्जाबाबत खात्री देता येत नाही. विशेषतः बाटलीबंद पाणी, खरेदी करताना बहुतांश प्रवासी प्रसिद्ध ब्रँडवरच विश्वास ठेवतात. दरम्यान, सोशल मीडियावर एक व्हिडीओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये रेल्वे स्थानकावरील एका विक्रेत्याकडे ‘एल्व्हिश’ (Elvish) नावाच्या बाटलीबंद पाण्याची विक्री होत असल्याचे पाहून एक प्रवासी त्याला जाब विचारताना दिसतो आहे.

उत्तर प्रदेशातील प्रयागराज जंक्शनवरील एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे, ज्यामध्ये प्रवासी विक्रेत्याला ‘एल्व्हिश’ (Elvish) नावाच्या बाटलीबंद पाण्याच्या ब्रँडच्या विक्रीबाबत जाब विचारताना दिसत आहे. हा ब्रँड अनधिकृत असल्याचा आरोप प्रवाशाने केला आहे. प्रवाशाचा असा दावा आहे की, या पाण्याच्या बाटल्यांना रेल्वेची अधिकृत मान्यता नाही; त्यामुळे त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना यात हस्तक्षेप करण्याची विनंती केली.

व्हिडीओमध्ये प्रवासी स्टॉलवरील विक्रेत्याला तेथे विक्रीसाठी ठेवलेल्या पाण्याच्या बाटल्यांबाबत जाब विचारताना दिसतो. रेल्वे स्थानकांवर प्रवाशांना केवळ अधिकृत आणि मान्यताप्राप्त ब्रँडची उत्पादने मिळण्याचा अधिकार असल्याचे तो ठामपणे सांगतो. तसेच, या प्रकरणाची तक्रार करूनही स्टॉलवरील कर्मचाऱ्यांनी त्याकडे गांभीर्याने न पाहता उदासीन भूमिका घेतल्याचा आरोपही त्याने केला आहे.

या समस्येबाबत चिंता व्यक्त करत, संबंधित प्रवाशाने सोशल मीडियावर ‘इंडियन रेल्वे’ला टॅग केले आणि आरोप खरे आढळल्यास त्या विक्रेत्याचा परवाना रद्द करण्याची मागणी केली. कारण – अनधिकृत बाटलीबंद पाण्याची विक्री प्रवाशांच्या सुरक्षेला धोका निर्माण करू शकते. विशेषतः देशातील अत्यंत वर्दळीच्या रेल्वे स्थानकांपैकी एका स्थानकावर हा प्रकार घडल्याने हा मुद्दा चर्चेत आला आहे.

व्हिडीओ नक्की बघा…

या पोस्टची दखल घेत आणि हा व्हिडिओ ऑनलाइन मोठ्या प्रमाणावर चर्चेत आला असून ‘रेल्वे सेवा’ (Railway Seva) ने सुद्धा प्रतिक्रिया देत
“संबंधित अधिकाऱ्यांना याबद्दल सूचित केले जात आहे. @drmprayagrajnc झालेल्या गैरसोयीबद्दल आम्ही दिलगीर आहोत. कृपया तुमचा मोबाईल क्रमांक आमच्याशी ‘डीएम’ (DM) द्वारे शेअर करावा, अशी विनंती आम्ही करतो. तसेच, त्वरित निवारणासाठी तुम्ही ‘रेल-मदत’ (RailMadad) वर थेट तुमची तक्रार नोंदवू शकता,” असे ‘रेल्वेसेवा’ने आपल्या उत्तरात म्हटले आहे. या घटनेमुळे प्रवाशांमध्ये चर्चा सुरू झाली असून, अनेकजण रेल्वे स्थानकांवरील खाद्यपदार्थ आणि पेये विकणाऱ्यांवर अधिक कडक देखरेख ठेवण्याची मागणी करताना दिसत आहेत.