Pet Dog Chase Owner Car In Viral Video : पाळीव प्राण्यांना लाडाने घरी घेऊन येणे, त्यांच्याबरोबर फोटो काढणे भरपूर सोपे असते. मग त्यांना सांभाळणे, त्यांची काळजी घेणे, त्यांची स्वच्छता राखणे या गोष्टी करणे कित्येकांना कठीण जाते आणि मग ते ही जबाबदारी झटकून देण्यासाठी नको ते मार्ग अवलंबताना दिसतात. सोशल मीडियावर व्हायरल होणारा हा व्हिडीओ असेच काहीतरी दृश्य दाखवतो आहे. एका मालकाने आपल्या पाळीव श्वानाला रस्त्यावर सोडून दिले आहे; जे पाहून तुमच्याही डोळ्यांत पाणी तरळल्याशिवाय राहणार नाही.
व्हायरल व्हिडीओ हरियाणातल्या फरीदाबादमधील आहे. तेथील प्राण्यांना क्रूरतेची वागणूक देणारी एक अतिशय वेदनादायक घटना समोर आली आहे. व्हायरल व्हिडीओत खूप मोठ्या संख्येने गाड्या रस्त्यावरून जात असतात. यादरम्यान एका गाडीच्या मागून एक पाळीव श्वान धावताना दिसतो आहे. शनिवार, ५ जुलै रोजी दुपारी १२ वाजून ३० मिनिटांच्या दरम्यान फरीदाबादच्या क्यूआरजी हॉस्पिटलसमोर एका व्यक्तीने निर्दयीपणे पाळीव श्वानाला रस्त्यावर सोडून दिले. कारचा क्रमांक HR51 CF 2308 असा आहे. प्रत्यक्षदर्शीने @TheViditsharma या एक्स युजरने हा क्षण पाहिला आणि सोशल मीडियावर शेअर केला.
ज्याने अजून जग पाहिले नाही, त्याला रस्त्यावर सोडून दिले (Viral Video)
एवढेच नाही, तर मालकाने जबाबदारी झटकली असली तरीही श्वान मात्र मालकाच्या गाडीमागे चक्क दोन किलोमीटरपेक्षा जास्त अंतरावर गाडीचा पाठलाग करीत राहिला. पण, कारचालकाने गाडी काही थांबवली नाही. व्हायरल व्हिडीओत ज्या प्रकारे अज्ञात व्यक्तीने श्वानाला सोडून दिले, त्यावरून त्या बिचाऱ्या श्वानाला कोणतीही गाडी चिरडून जाऊ शकते किंवा इतर श्वानांकडूनही त्याच्यावर हल्ला होण्याचा धोका आहे, असे स्पष्ट दिसून येते आहे. सोशल मीडियावर व्हायरल होणारा व्हिडीओ एकदा बघाच…
व्हिडीओ नक्की बघा…
सोशल मीडियावर व्हायरल होणारा हा व्हिडीओ @TheViditsharma या एक्स युजरने शेअर केला आहे आणि ‘कृपया गुन्हेगाराला ओळखण्यास मदत करा आणि जीव वाचवण्यासाठी RT करा’, अशी कॅप्शन व्हिडीओला दिली आहे. नेटकरी व्हिडीओ पाहून राग व्यक्त करताना दिसत आहेत आणि “लोक इतके क्रूर का असतात? हे तर असं झालं ज्याने अजून जग पाहिलेले नाही. त्याला रस्त्यावर सोडून दिले आहे. आता त्याला एकटेच सर्वकाही सहन करावे लागेल”, “स्वत:च्या लेकराला असं सोडलं असतं का” आदी कमेंट्स युजरने केल्या आहेत.