Pregnant Woman Shows Off Baby Bump While Dancing Viral Video : गर्भवती महिलेसाठी फुलांची आकर्षक सजावट करून घर किंवा हॉल सजवणे, हातात धनुष्यबाण घेऊन तिचे नवऱ्याबरोबर फोटो काढणे, तसेच तिची ओटी भरून तिच्या नव्या प्रवासासाठी भरभरून शुभेच्छा देणे, अशी डोहाळे जेवणाची परंपरा आहे. हा खास सोहळा साधारणपणे गर्भावस्थेच्या सातव्या महिन्यात आयोजित केला जातो. एवढंच नाही, तर जगभरात डोहाळे जेवणाचा हा सोहळा वेगवेगळ्या पद्धतीने साजरा केला जातो.तर सध्या अशाच एका गर्भवती महिलेचा व्हिडीओ व्हायरल होतो आहे, ज्यामध्ये तिने खूप सुंदररित्या डान्स करून सगळ्यांना थक्क करून सोडले आहे.

न्यूयॉर्कमधील डिजिटल क्रिएटर असलेल्या सिल्वरी शाह यांनी जानेवारी महिन्यात आपल्या जवळच्या मित्र-मैत्रिणी आणि कुटुंबीयांसोबत ‘बेबी शॉवर’चा कार्यक्रम साजरा केला होता. गुलाबी रंगाचा पोशाख परिधान करून, सिल्वरी यांनी १९९० मधील ‘सैलाब’ (Sailaab) चित्रपटातील माधुरी दीक्षितच्या ‘हमको आज कल है इंतजार’ या गाण्यावर नृत्य केले.

स्टेजच्या मध्यभागी येऊन त्यांनी अतिशय उत्तमरित्या ठेका धरला आणि गाण्याच्या मूळ कोरिओग्राफीशी जुळणाऱ्या सुंदर स्टेप्स देखील केला. त्यामुळे त्यांचा हा डान्स पाहून मित्र-मैत्रिणी आणि कुटुंबीयांनी टाळ्यांच्या कडकडाटात त्यांना भरभरून दाद दिली आहे आणि या व्हिडीओला २० लाखांहून अधिक व्ह्यूज आणि हजारो प्रतिक्रिया मिळाल्या आहेत.

व्हिडीओ नक्की बघा…

सोशल मीडियावर व्हायरल होणारा हा व्हिडीओ @silvery_shah या इन्स्टाग्राम अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे. नेटकरी व्हिडीओ पाहून “जबरदस्त, चक्क हिल्स घालून डान्स केला”, “दीदी, तुम्हाला खूप खूप शुभेच्छा आणि अभिनंदन. पण, हिल्स घालून असा डान्स करताना स्वतःची आणि बाळाची काळजी घ्या”, “स्त्रीच्या आयुष्यातील हा आनंद खरोखरच वेगळा असतो”, “हे खूपच गोड आहे! तुमच्या नवजात बाळासाठी भावना व्यक्त करण्याचा हा खूप सुंदर मार्ग आहे” ; आदी अनेकविध कमेंट्स नेटकरी व्हिडीओखाली करताना दिसून आले आहेत.

अनेक प्रेक्षकांना हा व्हिडीओ आवडला असला तरीही तज्ज्ञांचा असा सल्ला असतो की, गरोदरपणात नृत्य करण्यासह कोणत्याही शारीरिक हालचाली करताना काळजी घेणे आवश्यक आहे. गरोदर महिलांना सामान्यतः असा सल्ला दिला जातो की, कोणत्याही व्यायामाची सुरुवात करण्यापूर्वी त्यांनी आपल्या डॉक्टरांचा किंवा आरोग्यसेवा तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा आणि पडण्याचा किंवा दुखापत होण्याचा धोका निर्माण करू शकणाऱ्या हालचाली टाळाव्यात.