viral video car quotes : पूर्वी आईची माया आणि बाबांची शिस्त, असा पालकांच्या स्वभावाचा परिचय करून दिला जायचा. पण, वडील ही आयुष्याला लाभलेली देणगी आहे हेही विसरून चालणार नाही. जबाबदारी, कर्तव्य व माया या तिन्ही गोष्टींचा एक सुंदर मेळ असणारे कणखर व्यक्तिमत्त्व म्हणजे आपले बाबा असतात. जेव्हा स्त्रिया घराबाहेर नोकरीसाठी जाऊ लागल्या, तेव्हा हळूहळू प्रेम व्यक्त करणारा आधुनिक बाप जन्माला आला. तर आज हीच गोष्ट लक्षात ठेवून एका चालकाने गाडीच्या पाठी वडिलांसाठी एक सुंदर ओळ लिहिली आहे, जी वाचून तुम्ही नक्कीच भारावून जाल…
प्रवासादरम्यान सिग्नल लागल्यावर सगळ्या गाड्या एका ठिकाणी थांबतात. त्यादरम्यान एका चालकाला चारचाकी गाडीच्या मागे लिहिलेली एक सुंदर आणि लाखमोलाची पाटी दिसली. वेळ न घालवता किंवा अगदी क्षणाचाही विचार न करता, त्या चालकाने गाडीच्या पाटीचा व्हिडीओ काढण्यास सुरुवात केली. कारण- त्या गाडीच्या पाठीवर लिहिलं होतं… ‘कुठलाही नवस न करता पावणारा देव म्हणजे वडील’. ही ओळ वाचताच त्याने व्हिडीओ काढून सोशल मीडियावर शेअर केला.
“बाप म्हणजे देव माणूस…” (Viral Video)
फिरायला जाताना, घरात नवीन वस्तू आणताना ते अगदी लग्नासाठी मुलगा पसंत केल्यावर सगळ्यात आधी बाबांची परवानगी घ्यावी लागते. त्यामुळे मनात प्रेम, पण चेहऱ्यावर राग असणाऱ्या बाबांना सगळेच थोडे घाबरून राहतात. पण, या सगळ्या गोष्टी जरी खऱ्या असल्या तरीही व्हिडीओवर लिहिलेल्या ओळींप्रमाणे ‘कुठलाही नवस न करता पावणारा देव म्हणजे वडील’ असतो हेही विसरून चालणार नाही. वडिलांप्रति प्रेम दाखवत सुंदर पाटी लिहिलेल्या चालकाचा व्हिडीओ एकदा तुम्हीसुद्धा नक्की बघा…
व्हिडीओ नक्की बघा…
सोशल मीडियावर व्हायरल होणारा हा व्हिडीओ @kahani.on.the.go24 या इन्स्टाग्राम अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे. नेटकरीसुद्धा या वाक्याला सहमती दाखवत, “बाप म्हणजे देव माणूस…”, “बाप म्हणजे काय असतं..? जो स्वतः उपाशी राहून आपल्या पोरांना जेवायला देतो, तो म्हणजे बाप असतो. जो स्वतः फाटके कपडे घालतो आणि पोरांना चांगले कपडे देतो, तो बाप असतो”, “खरं आहे भावा” आदी अनेकविध कमेंट्स नेटकरी व्हिडीओखाली करताना दिसून आले आहेत.
