Viral Video Car Owner Messages For Father : आई आणि मुलांमधील नातं जितकं सहज व्यक्त होणारं असतं, तितकं अनेकदा बाबा आणि मुलांचं नातं नसतं. बाबा आपल्या भावना शब्दांत व्यक्त करत नसले, तरी त्यांच्या कृतीतून मुलांवरील प्रेम दिसून येतं. मुलांच्या भविष्यासाठी केलेली धडपड, त्यांच्या छोट्या-छोट्या गरजांची घेतलेली काळजी आणि कठीण प्रसंगी दिलेली खंबीर साथ यातून बाबांचं प्रेम जाणवतं. त्यामुळे बाबा आणि मुलांमधील संवाद कमी असला, तरी त्यांची घरातली उपस्थितीच मुलांना सुरक्षिततेची आणि आधाराची भावना देऊन जाते.
अनेकदा असं घडतं की, विचार पटले नाहीत किंवा मतं जुळली नाहीत की बाबांबरोबर वाद होतो. सुरुवातीला छोट्या कारणावरून झालेला हा वाद कधी इतका टोकाला जातो की, दोघांमध्ये अबोला निर्माण होतो. मग अनेक दिवस एकमेकांशी बोलणं टाळलं जातं. मनात राग असला तरी बाबांशी न बोलण्याचा हा अबोला तुम्हालाही आणि बाबांनाही आतून अस्वस्थ करून सोडतो. कारण कितीही मतभेद झाले, तरी मनाच्या एका कोपऱ्यात बाबांशी पुन्हा पूर्वीसारखं बोलावंसं वाटत असतं.
तर या प्रसंगाचा जणू काही संदर्भ घेत एका कारचालकाने त्यांच्या गाडीच्या मागे एक सुंदर ओळ लिहिली आहे. प्रवासादरम्यान सिग्नल लागल्यावर सगळ्या गाड्या एका ठिकाणी थांबतात. तेव्हा @komal_thakur307 इन्स्टाग्राम युजरला ही कार आणि ती सुंदर ओळ दिसते. वेळ न घालवता किंवा अगदी क्षणाचाही विचार न करता, त्या युजरने गाडीच्या व्हिडीओ काढण्यास सुरुवात केली. कारण- त्या गाडीच्या पाठीवर लिहिलं होतं… ‘एक वेळेस देव रुसला तरी चालेल बाप रुसता कामा नये. काळीज थांबतय ओ…’ . एकदा बघाच हृदयस्पर्शी व्हिडीओ…
व्हिडीओ नक्की बघा…
सोशल मीडियावर व्हायरल होणारा हा व्हिडीओ @komal_thakur307 या इन्स्टाग्राम अकाउंटवरुन शेअर करण्यात आला आहे. नेटकरी व्हिडीओ पाहून भारावून गेले आहेत. काही जण बाबांच्या आठवणीत कमेंट करताना दिसत आहेत. तर अनेक जण ‘एकदम खरं आहे ओ…’, ‘काय लिहिलंय राव वाचताना डोळे भरून आले राव’, ‘खरं आहे हे’, ‘लाखात बोलला दादा’, ‘बापचं देव आहे’, ‘खरच खुप सुदर लिहलं आहे .शब्द नाही बोलायला’ ; आदी अनेकविध कमेंट्स नेटकरी व्हिडीओखाली करताना दिसून आले आहेत.
