21 years giving bottles to travellers viral video : एखाद्या ठिकाणी फिरायला गेल्यावर तिथल्या खास वस्तू खरेदी करण्याचा मोह प्रत्येकालाच होतो. कारण – त्या वस्तूंमध्ये त्या ठिकाणच्या आठवणी आपल्या बरोबर आयुष्भर राहणार असतात. मात्र, राजस्थानला भेट देणारे अनेक पर्यटक एखादी वस्तू नव्हे, तर आयुष्यभर लक्षात राहील अशी माणुसकीची शिकवण बरोबर घेऊन परतत आहेत. एका दिलदार व्यक्तीची ओळख इन्स्टाग्रामवरील व्हायरल व्हिडीओमुळे जगासमोर आली आहे. गेली २१ वर्षे निस्वार्थपणे प्रवाशांची तहान भागवणाऱ्या या वृद्ध व्यक्तीच्या सेवाभावाने हजारो नेटकऱ्यांची मने जिंकली आहेत.

७७ वर्षीय थाना राम कडवासरा गेल्या २१ वर्षांपासून बारमेरमधील एका गजबजलेल्या रस्त्यावरून वाळवंटातून प्रवास करणाऱ्या प्रवाशांना पाण्याच्या बाटल्या पुरवण्याचे काम करतात. दररोज बाडमेर-बटाडू मार्गावर ठाणा राम हे बसमधील प्रवासी, टॅक्सी चालक आणि वाटसरूंसाठी थंड पिण्याच्या पाण्याने बाटल्या काळजीपूर्वक भरताना दिसतात. उन्हाळ्यात जिथे तापमान नियमितपणे ४५ ते ४७ अंश सेल्सिअसपर्यंत पोहोचते, अशा प्रदेशात त्यांची ही साधी पण मोलाची कृतीप्रवास करणाऱ्यांना दिलासा देऊन जाते.

त्यांच्या या कामाची जाहिरात करणारे कोणतेही फलक नाहीत, देणगी गोळा करण्याची मोहीम नाही आणि सोशल मीडियावर प्रसिद्धी मिळवण्याचाही कोणताही प्रयत्न नाही. फक्त एक वृद्ध माणूस, काही पाण्याच्या बाटल्या आणि अनोळखी लोकांची तहान भागवण्याची मनापासूनची इच्छा एवढ्याच साध्या पद्धतीने तो जवळजळ २१ वर्षांपासून प्रवाशांची सेवा करत आहे; तेही कोणतेही पैसे न घेता. आजच्या जीवनात पैशांशिवाय एक घोट पाणीही न देणारे त्यांच्या निःस्वार्थ सेवाभावामुळे अनेकांसाठी प्रेरणादायी ठरले आहेत.

व्हिडीओ नक्की बघा…

सोशल मीडियावर व्हायरल होणारा हा व्हिडीओ @desertslife या इन्स्टाग्राम अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे. त्यांचे हे काम पाहायला साधे वाटू शकते. पण, राजस्थानच्या कडक उन्हात पाणी वाटपाचे काम करणेही वाटते तितके सोपे नाही आहे. हा व्हिडीओ पाहून अनेक नेटकरी भावूक झाले असून ७७ वर्षीय ठाणा राम यांच्या निःस्वार्थ सेवाभावाचे आणि समर्पणाचे भरभरून कौतुक करत आहेत. परिसरातील तापमान दिवसेंदिवस वाढत असताना, गेली २१ वर्षे निस्वार्थपणे लोकांची तहान भागवणाऱ्या या वृद्ध व्यक्तीबद्दलचा आदरही तितकाच वाढत आहे.