Rapido auto driver picking up Indian Flag: प्रजासत्ताक दिनाच्या निमित्तानं देशभरात देशभक्तीचं वातावरण पाहायला मिळालं. गल्ली-बोळांपासून महामार्गांपर्यंत तिरंगा फडकताना दिसत होता. लहान मुलांपासून ते ज्येष्ठांपर्यंत प्रत्येकाच्या मनात देशाविषयी अभिमान आणि आपुलकीची भावना ओसंडून वाहत होती. अशा वेळी सोशल मीडियावर काही क्षण असे समोर येतात, जे कोणतंही मोठं भाषण किंवा घोषणा न करता, थेट मनाला भिडतात. रोजच्या धावपळ, गोंगाटात आणि ट्रॅफिकच्या गर्दीत अचानक दिसलेला एक साधा, पण अर्थपूर्ण क्षण लोकांच्या मनात घर करून जातो. अशाच एका क्षणानं सध्या सोशल मीडियावर सर्वांचं लक्ष वेधून घेतलं असून, देशप्रेम म्हणजे नेमकं काय, हे त्यातून शांतपणे, पण ठामपणे स्पष्ट होत आहे.

या व्हिडीओमध्ये एक हृदयस्पर्शी दृश्य पाहायला मिळतं. सिग्नलवर थांबलेल्या एका कारमध्ये बसलेली लहान मुलगी आनंदाने खिडकीतून तिरंगा झेंडा हलवत असते. अचानक तिच्या हातातून झेंडा खाली रस्त्यावर पडतो. ही गोष्ट पाहताच जवळच असलेला एक रिक्षाचालक क्षणाचाही विचार न करता झपाट्यानं त्या दिशेने धावत येतो.

तो रस्त्यावर पडलेला तिरंगा अत्यंत आदरानं उचलतो आणि परत जाऊन तो झेंडा त्या चिमुकल्या मुलीच्या हातात देतो. या सगळ्या प्रसंगात कुठलाही गाजावाजा नाही, कुठलीही अपेक्षा नाही; फक्त झेंड्याविषयी असलेला सन्मान आणि देशाविषयीचं प्रेम स्पष्टपणे दिसून आलं. झेंडा उचलून दिल्यावर मुलीच्या चेहऱ्यावर हसू उमटलं आणि रिक्षाचालकाच्या चेहऱ्यावर समाधानाची भावना दिसली.

पाहा व्हिडीओ

हा व्हिडीओ सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ट्विटर ‘ @emo_ananya या अकाउंटवर शेअर करण्यात आला आहे. हा व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत असून, नेटकऱ्यांकडून त्यावर जोरदार प्रतिक्रिया येत आहेत. अनेकांनी रिक्षाचालकाच्या तत्परता आणि देशभक्तीचं भरभरून कौतुक केलं आहे. एका युजरनं लिहिलं, “हा क्षण खूपच सुंदर आणि मनाला स्पर्श करणारा आहे.” दुसऱ्या युजरनं प्रतिक्रिया देताना म्हटलं, “हे पाहून एकाच वेळी समाधान आणि अभिमान वाटतो.”

काही जणांनी तर रिक्षाचालकाला ‘खरा हीरो’ म्हटलं आहे. “अशाच छोट्या कृतींमधून देशप्रेम दिसून येतं,” अशी भावना अनेक प्रतिक्रियांमधून व्यक्त करण्यात आली आहे. तर एका युजरनं भावनिक प्रतिक्रिया देत लिहिलं, “या माणसाला माझ्याकडून मनापासून सलाम.” हा व्हिडीओ केवळ व्हायरल ट्रेंड न राहता, देशप्रेमाची खरी व्याख्या काय असते, हे दाखवणारा आहे. सामान्य माणसाच्या छोट्याशा कृतीतून उमटलेलं हे मोठं राष्ट्रप्रेम पाहून अनेकांच्या डोळ्यांत अभिमानाचे अश्रू तरळले आहेत.