Viral Video: काही दिवसांपासून संपूर्ण राज्यभरात मुसळधार पाऊस कोसळत आहे. राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये पूरजन्य परिस्थिती उदभवली असून, अनेक ठिकाणचे जनजीवन विस्कळित झाले आहे. पावसाच्या दिवसांत खेड्यांतील लोक त्यांच्यासह त्यांच्या पाळीव प्राण्यांचीदेखील खूप काळजी घेतात. त्यांचे पावसापासून संरक्षण व्हावे यासाठी गोठा बांधतात, त्यांच्या खाण्या-पिण्याची सोय करून ठेवतात. सध्या असाच एक व्हिडीओ व्हायरल होत आहे; ज्यात एका महिलेने तिच्या पाळीव प्राण्यांना रेनकोट घातल्याचे दिसत आहे.
मालक आणि घरातील पाळीव प्राण्यांचे नाते नेहमीच खूप खास असते. कुत्रा आणि मांजरीबरोबरचे गोड नाते आपण नेहमीच पाहतो. पण, खेड्यात अनेकांच्या घरी गाय, बैल, म्हैस, शेळी हे प्राणीदेखील पाळले जातात. या पाळीव प्राण्यांबरोबरचे त्या घरातील प्रत्येकाशी खूप छान नाते असते. या प्राण्यांना विविध नावांनी हाक मारली जाते, त्यांच्याशी संवाद साधला जातो. सध्या व्हायरल होत असलेल्या व्हिडीओतून प्राण्यांच्या मालकिणीचे प्राण्यांबद्दल असलेले प्रेम पाहायला मिळत आहे.
नक्की काय घडलं व्हिडीओमध्ये? (Viral Video)
या व्हायरल व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता की, भरपावसात एक महिला काही शेळ्यांना घेऊन शेतात जाताना दिसत आहे. यावेळी तिच्या सर्व शेळ्यांना रेनकोट घालण्यात आला होता. शेळ्यांनी घातलेला रेनकोट पाहून एक तरुण गाडी थांबवतो आणि त्या महिलेला गमतीमध्ये, ‘मावशी, रेनकोट शिवलाय काय’, असा प्रश्न विचारतो. त्यावर ती महिला हसून हो म्हणते. सध्या हा व्हिडीओ सोशल मीडियावर खूप व्हायरल होत आहे.
हा व्हिडीओ इन्स्टाग्रामवरील @marathi_epic_jokes या अकाउंटवरून शेअर करण्यात आला असून, या व्हिडीओला आतापर्यंत तीन दशलक्षांहून अधिक व्ह्युज आणि तीन लाखांहून अधिक लाइक्स मिळाल्या आहेत. तसेच अनेक जण या व्हिडीओवर कमेंट्स करताना दिसत आहेत.
पाहा व्हिडीओ:
युजर्सच्या कमेंट्स चर्चेत
एका युजरने या व्हिडीओवर लिहिलेय, “गावाकडची माणसं आपल्या जनावरांना लेकरासारखा जीव लावतात.” तर दुसऱ्या युजरने लिहिलेय, “साधी-भोळी माणसं फक्त गावाकडे पाहायला मिळतात; कोणालाही जीव लावणारी.” तिसऱ्या युजरने लिहिलेय, “मावशीने अगदी आपल्या लेकरांसारखी आपल्या शेळ्यांची अन् त्यांच्या पिल्लांची काळजी घेतली आहे. मुसळधार पावसात त्यांना चरवायला न्यावं लागतं; पण पावसात त्यांचेसुद्धा खूप हाल होतात हे ओळखून काळजी घेतलीय. खूप छान.” आणखी एकाने लिहिलेय, “पशुसेवा म्हणजे ईश्वर सेवा.”
© IE Online Media Services (P) Ltd