चीनमधील हुनान प्रांतातील जगातील सर्वात उंच आणि लांब ‘ग्लास ब्रिज’ जनतेसाठी खुला करण्यात आला आहे. या ब्रिजवर चालणे हा रोमांचकारी अनुभव आसून, स्वप्नवत वाटावे असाचा हा अनुभव आहे. साहसाची आवड असणारे याचा आनंद घेऊ शकत असले तरी ज्यांना उंचावरून चालण्याची भीती वाटते त्यांच्यासाठी हे एखाद्या वाईट स्वप्नापेक्षा कमी नाही. व्हायरल होत असलेल्या एका व्हिडिओमध्ये या ब्रिजवरून चालताना भयभीत झालेल्यांना चित्रीत करण्यात आले आहे. ‘ग्लास ब्रिज’ची लांबी ४३० मीटर असून रुंदी ६ मीटर इतकी आहे. ३०० मीटर खोल दरीवर हा ब्रिज बंधण्यात आला आहे. इतक्या उंचीवरून खाली पाहिल्यास कोणालाही भीती वाटू शकते. असे असले तरी काहीजण या ब्रिजवरून चालण्याच्या थराराचा आनंददेखील लुटत आहेत. ब्रिजच्या फ्लोअरला लावण्यात आलेल्या काचा इतक्या नितळ आहेत की ब्रिजवरून चालणाऱ्याला आपण हवेत चालत आहोत असेच वाटेल. कांचांमधून खोल दरीचे दर्शन होत असल्याने ज्यांना उंचावरून चालण्याची भीती वाटते ते खाली पाहाताच भयभीत होतात. व्हायरल होत असलेल्या या व्हिडिओमध्ये अशाच काहीजणांचे भेदरलेले हावभाव टिपण्यात आले आहेत. ते इतके घाबरले आहेत की त्यांना अक्षरश: खेचून न्यावे लागत असल्याचे व्हिडिओमध्ये पाहायला मिळते. कोट्यावधी डॉलर्स खर्च करून बांधण्यात आलेल्या या ब्रिजमध्ये ९९ ग्लास पॅनल्स लावण्यात आले आहेत. हा पुल एका वेळी ८०० लोकांचा भार सहन करु शकतो. ब्रिजवरून खाली पाहाताच खोल दरी नजरेस पडते. ज्यामुळे आपण किती उंचावर आहोत याचा आंदाज येऊन लोकांना भीती वाटते.

व्हिडिओ पाहा