Funny ATM setup in Pakistan: सध्या सोशल मीडियावर एक भन्नाट व्हिडीओ व्हायरल होत आहे, जो पाकिस्तानमधील एका बँकेच्या ATM मध्ये घडलेली आश्चर्यचकित करणारी घटना दाखवतो. या व्हिडीओत दिसणाऱ्या दृश्यामुळे अनेकांना स्वत:च्या डोळ्यांवर विश्वास ठेवणे कठीण झालेय. हा व्हिडीओ पाहून तुम्हालाही ‘असं काही असतं’, असा प्रश्न नक्कीच पडेल.
आजकाल प्रत्येकाच्या हातात स्मार्टफोन असून, सोशल मीडियावर वेळ घालवणं ही रोजची बाब झाली आहे. रोज नवनवीन व्हिडीओ, मिम्स, रील्स आपल्याला पाहायला मिळतात. त्यातले काही हसवतात, काही विचार करायला लावतात आणि काही थेट हैराण करतात. अशाच प्रकारचा एक व्हिडीओ इन्स्टाग्रामवर @iamahadahmed नावाच्या अकाउंटवरून पोस्ट करण्यात आला असून, तो आतापर्यंत हजारो लोकांनी पाहिला आहे.
नेमकं काय आहे या व्हिडीओत?
व्हिडीओमध्ये एक तरुण पाकिस्तानच्या कराची शहरातील एका बँकेच्या ATM कक्षात जातो आणि तिथल्या आतल्या गोष्टी दाखवतो. सुरुवातीला सगळं सामान्य वाटतं; पण नंतर जे दिसतं, ते चकित करणारं आहे. ATM मधील एसी (AC) आणि सीसीटीव्ही कॅमेरा या दोन्ही गोष्टी ‘जाळीत’ ठेवण्यात आल्या आहेत. हो, अगदी शाब्दिक अर्थाने तसेच त्यावर लावलेले बंद टाळे म्हणजेच चोरीपासून वाचवण्यासाठी ATM मध्ये लावलेल्या सुविधा जणू तुरुंगात बंदिस्त केल्यात.
तो तरुण सांगतो, “हे बघा आमच्या पाकिस्तानात काय चाललंय… AC आणि कॅमेरा चोरी होऊ नये म्हणून जाळीत आणि त्यावर टाळे… काय होईल आपल्या देशाचं?”.
लोकांची प्रतिक्रिया : हास्य आणि चिंता
हा व्हिडीओ पाहिल्यानंतर सोशल मीडियावर कमेंट्सचा पाऊस पडला आहे. एकानं लिहिलं, “लाहोरमध्ये असं होत नाही”, तर दुसऱ्यानं कमेंट केली, “ATM वरच कुलूप लावा आता!” आणखी एका युजरने विचारलं, “टाळ्यालाच लॉक नाही का केलं?” आणि काहींनी थेट म्हटलं, “अशानं कशी प्रगती करणार पाकिस्तान?”
येथे पाहा व्हिडीओ
हा व्हिडीओ जितका विनोदी वाटतो, तितकाच तो विचार करायला लावणारा आहे. एटीएमसारख्या सुरक्षित असाव्या अशा ठिकाणी जर अशा प्रकारे ‘जुगाडू’ उपाय करण्यात येत असतील, तर स्थानिक प्रशासन किती सजग आहे हे सहज लक्षात येतं. एकीकडे डिजिटल बँकिंगच्या गोष्टी, तर दुसरीकडे एसी आणि कॅमेऱ्यांना जाळी लावून टाळे? पाकिस्तानातील ही परिस्थिती पाहून अनेकांनी “काय खरंच प्रगती होईल का” असा प्रश्न उपस्थित केला आहे.
हा व्हिडीओ पाहिलात का? तुमचं मत काय आहे अशा जुगाडू सिस्टीमबद्दल?