सोशल मीडियाच्या काळात एखादा व्हिडीओ क्षणात लाखो लोकांपर्यंत पोहोचतो आणि तो केवळ मनोरंजनापुरताच मर्यादित न राहता मोठा वाद निर्माण करतो. विशेषतः रस्त्यावरील स्टंट, जीवघेणे कृत्य आणि कायद्याची उघडपणे मस्करी करणारे प्रकार समाजासाठी गंभीर इशारा ठरत आहेत. लोकप्रिय होण्यासाठी काही लोक धोकादायक कृत्य करतात. यात ते स्वतःचा जीव तर धोक्यात घालतातच, पण रस्त्यावर चालणाऱ्या किंवा प्रवास करणाऱ्या लोकांचाही जीव संकटात टाकतात.

अशाच एका घटनेमुळे पुन्हा एकदा रस्त्यावरील सुरक्षेचा प्रश्न समोर आला आहे. या प्रकारामुळे प्रशासन, पोलिस आणि नागरिकांची जबाबदारी काय आहे यावर चर्चा सुरू झाली आहे. तसेच लोकांना आता कायद्याची भीती उरली नाही का? की नियम नीट पाळले जात नाहीत, असा प्रश्नही अनेकांना पडला आहे.

बिहारमधील एका गजबजलेल्या महामार्गावर घडलेल्या या घटनेचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये दोन तरुण दुचाकीवर वेगात जाताना थेट जीव धोक्यात घालणारे स्टंट करतात आणि. वेगात धावणाऱ्या बाईकवर दोघेही उभे राहून, हातात हात घालून, ट्रकजवळून धोकादायकपणे बाईक चालवताना दिसतात.

धोक्याची सीमा तेव्हा ओलांडली जाते, जेव्हा हे स्टंटबाज तरुण थेट बिहार पोलिसांच्या जीपसमोरूनच स्टंट करत पुढे निघून जातात. गर्दीच्या रस्त्यावर, इतर वाहनांच्या मध्ये असा प्रकार घडत असतानाही कुठलीही भीती किंवा संकोच त्यांच्या चेहऱ्यावर दिसत नाही. हा व्हिडीओ समोर येताच वाहतूक नियमांची उघड थट्टा, पोलिसांच्या उपस्थितीतही कायद्याचे पालन न करणे आणि सर्वसामान्यांच्या सुरक्षेकडे केलेले दुर्लक्ष यामुळे प्रकरण गंभीर बनले.

पाहा व्हिडीओ

सोशल मीडियावर व्हायरल होणारा हा व्हिडीओ या एक्स @Nalanda_index अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे. “या व्हिडीओखाली सोशल मीडियावर अनेक संतप्त प्रतिक्रिया उमटल्या आहेत. “बिहारमध्ये आता पोलिसांची भीती राहिली नाही का?” असा प्रश्न अनेकांनी केला आहे. काही युजर्सनी दुचाकीचा नंबर पाहून आरोपींची ओळख पटवून त्यांच्यावर कडक कारवाई करण्याची मागणी केली आहे.

“बाईक जप्त करा, परवाना रद्द करा, अशा लोकांना रस्त्यावर गाडी चालवण्याचा अधिकार नाही,” अशा तीव्र प्रतिक्रियादेखील दिसत आहेत. लोकांच्या दबावानंतर बिहार वाहतूक पोलिसांनी या प्रकरणात धोकादायक वाहन चालवण्याचा गुन्हा दाखल केला आहे. आरोपींना शोधण्याचे काम सुरू असून बाईक जप्त करणे आणि दंडात्मक कारवाई केली जाईल, असे पोलिसांनी सांगितले आहे.