Viral Video Shows Father Gifted IPhone To Daughter : १० वी आणि १२ वीचा निकाल आपल्या सगळ्यांच्या पुढील वाटचालीसाठी खूप महत्त्वाचा असतो. त्यासाठी अनेक जण जीव लावून मेहनत घेतात. बोर्डाची परीक्षा म्हटल्यावर बहुतेक सर्वांनाच भरपूर टेन्शन येत असते. कधी कधी पाठांतर केलेली उत्तरेसुद्धा पेपर लिहिताना आठवत नाहीत. त्यामुळे गुण कमी मिळाले किंवा एखाद्या विषयात आपण नापास झालो, तर या भीतीने आपण स्वतःला कमी लेखून रडण्यास सुरुवात करतो. पण, निकालाचा एक कागद आपण अपयशी व्यक्ती आहोत हे कधीच ठरवू शकत नाही हे आपण विसरून जातो. त्यामुळे निकाल लागल्यावर आपल्या मुलांना कमी लेखण्यापेक्षा त्यांच्या मेहनतीचे कौतुक करण्याची गरज आहे हेच दाखविणारा एक व्हिडीओ व्हायरल होत आहे.
बाबा आणि लेकीमध्ये पैज लागली होती. ही पैज अशी होती की, १२वीत ९० टक्के गुण मिळाले, तर तुला आयफोन देणार. पण, निकाल लागला आणि लेकीला ८८ टक्के गुण मिळाले. तर लेक रडू लागली. पण, बाबा शेवटी बाबा असतात. ते आपल्या लाडक्या लेकीजवळ मिठाईचा बॉक्स घेऊन जातात. मुलगी मिठाईचा बॉक्स उघडत असते. तितक्यात बाबा तिच्या हातात दुसरा बॉक्स देतात. तेव्हा लेक थोडी आश्चर्याने त्या बॉक्सकडे बघते आणि खालीच बसते. नक्की काय असते त्या बॉक्समध्ये चला पाहू…
या व्हिडीओने माझ्या डोळ्यांत पाणी आणले (Viral Video)
व्हायरल व्हिडीओत तुम्ही पाहिले असेल की, चला आपल्या मुलीला तिच्या प्रयत्नांचे बक्षीस देऊ (चलो, बिटिया की मेहनत का इनाम दे ही दिया जाये), असा मजकूर व्हिडीओवर लिहिण्यात आलेला असतो. बाबा घरामध्ये मिठाईचा बॉक्स घेऊन जातात. त्यानंतर मिठाईचा बॉक्स उघडेपर्यंत ते लेकीच्या हातात दुसरा बॉक्स देतात; ज्यामध्ये आयफोन असतो. नवीन आयफोन बघताच तिच्या चेहऱ्यावर आनंदमिश्रित आश्चर्याचे भाव दिसू लागतात आणि बाबांना लेक अलगद मिठी मारते.
व्हिडीओ नक्की बघा…
सोशल मीडियावर व्हायरल होणारा हा व्हिडीओ @faridabadcouple या इन्स्टाग्राम अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे. ‘तुमच्या मुलांचे कौतुक करा, त्यांचा निकाल पाहून त्यांना दोष देऊ नका’, अशी कॅप्शन व्हिडीओला देण्यात आली आहे. नेटकरीसुद्धा हा व्हिडीओ पाहून भारावून गेले आहेत. “एक बाबाच असतो, जो मुलीचे प्रत्येक स्वप्न पूर्ण करतो”, “भाऊ, मी कधीच कोणत्या व्हिडीओवर कमेंट करीत नाही. पण, या व्हिडीओने माझ्या डोळ्यांत पाणी आणले. मी माझ्या राजकुमारीबरोबरही असेच करेन”, आदी अनेक कमेंट्स नेटकरी करताना दिसत आहेत.