LPG delivery Boy Viral Video : इराण-इस्रायल (Iran Israel War) युद्धामुळे कच्चे तेल आणि नैसर्गिक वायूची आयात विस्कळीत झाली आहे, यामुळे भारतात गॅसचा तुटवडा निर्माण झाल्याचा दावा काही ठिकाणी केला जात आहे; त्यामुळे अन्न, वस्त्र, निवारा बरोबरच वेळेत सिलिंडर बुक करून तो घरी येणे आपल्या मूलभूत गरजांपैकी एक ठरलं आहे असं म्हणायला हरकत नाही. एकेकाळी सिलिंडर घेऊन येणाऱ्यांना एक ग्लास पाणी न विचारणारे आज सिलिंडर दारात आल्यावर नाचतात आणि सुट्ट्या पैशांसाठी भांडण करणारे आज सिलिंडर विकत घेण्यासाठी जास्तीचे पैसे द्यायलाही तयार होतात.

आज सोशल मीडियावर असाच एक व्हिडीओ व्हायरल होतो आहे, ज्यामध्ये सिलिंडर डिलिव्हरी करणारा बॉय डोक्यावर सिलिंडर घेऊन दारात उभा असतो, पण गृहिणी त्याला पैसे न देता किंवा उशिरा सिलिंडर आला म्हणून न ओरडता त्याला ओवाळताना दिसते आहे. फक्त आरती ओवाळत नाही तर अगदी एखादं युद्ध जिंकून आल्यासारखं त्याच्या कपाळावर टिळासुद्धा लावते आणि त्याला गोड भरवते. सिलिंडर घेऊन येणारा कर्मचारीसुद्धा गृहिणीच्या आपुलकीने, तिच्या खास स्वागताने डान्स करतो आणि तिच्या पाया पडतो.

‘काही का असेना निदान इज्जत तरी मिळतेय’ (Viral Video)

एखाद्या गोष्टीची किंमत ती निघून गेल्यावर किंवा तिचा पुरवठा कमी झाल्यावर आपल्याला जास्त जाणवते. सिलिंडरची डिलिव्हरी करणारी ही मंडळी दिवसभरात अगदी उन्हातान्हात फिरतात, अगदी घरात आणून सिलिंडर टेकवतात. पण, कधी त्यांच्याकडे सुट्टे पैसे नसतील तर आपण त्यांच्याशी भांडायचो, कधी वेळेत सिलिंडर घरी पोहचला नाही की आपण त्यांच्यावर रागवायचो. पण, आज हेच सिलिंडर देणारे कधीही दारात आले की एक सुटकेचा नि:श्वास आपण सध्या सोडतो.

व्हिडीओ नक्की बघा…

सोशल मीडियावर व्हायरल होणारा हा व्हिडीओ @mam_tagupta30 या इन्स्टाग्राम अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे. नेटकरी व्हिडीओ पाहून, ‘असू द्या, काही कारणाने दादांना इज्जत मिळाली, नाही तर त्यांना कोण विचारतसुद्धा नाही’, ‘वेळ पाहून माणूस इज्जत देतो’, ‘त्यांच्या हातामध्ये एवढे वजन आहे आणि तुम्ही त्यांची आरती करता वाह’, ‘दहा वीस रुपये जास्त दयायला विचार करणारे पण आता इज्जत देतात, काही का असेना निदान इज्जत तरी मिळतेय’, ‘हीच आपल्या देशाची खासियत आहे. आपण संकट काळातसुद्धा आनंदाचे क्षण शोधतो’; आदी अनेकविध कमेंट्स नेटकऱ्यांनी व्हिडीओखाली केलेल्या दिसून आल्या आहेत.