Video Shows Loco Pilot Stops Train For Passengers : आपण जगत असताना दुसऱ्याला जगायला मदत करणे हीच खरी मानवता आहे. दुसऱ्याला मदत करणे, समाजसेवा करणे, असे आपल्याला लहानपणापासून सांगितले जाते. पण, आपल्याला लिहितादेखील येणार नाहीत अशा आकड्यांचा गैरव्यवहार सध्या माणसे एकमेकांच्या विरोधात करताना दिसत आहेत. पण, आज सोशल मीडियावर असा एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. त्यामध्ये माणसांच्या रूपात मदत करण्यासाठी जणू काही देवच आला आहे, असे तुम्हीही म्हणाल.
कुटुंबाबरोबर ट्रेनने जायचे असल्यास आपल्याला घरातून वेळेतच निघावे लागते. थोडा जरी उशीर झाला की, एक लोकल गेल्यावर दुसरी येते. पण, ज्या एक्स्प्रेस गाड्या असतात, त्या वेळेत येऊन वेळेत निघतात. त्यामुळे वेळेत न पोचल्यास ही ट्रेन सुटलीच म्हणून समजा. तर आज व्हायरल व्हिडीओत असेच काहीतरी झाले. कुटुंबातले काही सदस्य ट्रेनमध्ये चढताच अचानक ट्रेन सुरू होते. पण, कुटुंबातील काही सदस्य प्लॅटफॉर्मवरच असतात. मग नंतर हे पाहून लोको पायलट आणि ट्रेन गार्ड काय करतात हे व्हायरल व्हिडीओतून तुम्हीसुद्धा नक्की बघा…
व्हिडीओ नक्की बघा…
व्हायरल व्हिडीओत तुम्ही पाहिले असेल की, एक्स्प्रेस रेल्वेस्थानकावरून सुटलेली असते. पण, अनेक जण रेल्वेस्थानकावरून धावत जणाऱ्या एक्स्प्रेसमध्ये चढण्याचा प्रयत्न करतात. यादरम्यान काहींचे सामान पडते. त्यामुळे धावत्या ट्रेनमध्ये चढणे त्यांना शक्य नसते. अनेक प्रवासी धावत ट्रेनमध्ये चढण्याचा प्रयत्न करीत आहेत; पण ते अयशस्वी ठरत आहेत. हे पाहून लोको पायलट ट्रेन थांबवतो आणि मग सगळे प्रवासी ट्रेनमध्ये चढतात. प्लॅटफॉर्मवर उपस्थित असलेल्या एका व्यक्तीने हा व्हिडीओ आपल्या मोबाईलमध्ये शूट करून घेतला आहे.
जीवापेक्षा काहीच महत्त्वाचं नाही
सोशल मीडियावर व्हायरल होणारा हा व्हिडीओ @gaya___junction या इन्स्टाग्राम अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे. नेटकरी हा व्हिडीओ पाहून लोको पायलट आणि ट्रेन गार्डचे कौतुक करताना दिसत आहेत… लोको पायलटशी संवाद साधणाऱ्या ट्रेन गार्डला सलाम, असे लोक क्वचितच आढळतात. ट्रेनला ५ मिनिटे उशीर झाला तर काहीही होणार नाही, फक्त प्रवाशांना बसवा आणि त्यांना नीट घेऊन जा, पण हे करू नकोस मित्रा! एक तर लवकर स्टेशनवर पोहोचा नाही तर ट्रेन जाऊ दे, जीवापेक्षा काहीच महत्त्वाचं नाही आदी अनेक कमेंट्स नेटकऱ्यांनी केल्याचे दिसत आहे.