सोशल मीडियावर खाद्यपदार्थांमधील भेसळ अन् अस्वच्छतेचे कित्येक व्हिडीओ रोज व्हायरल होत असतात जे पाहिल्यानंतर आपण खात असलेलं अन्न सुरक्षित आहे की नाही हा प्रश्न अनेकांच्या मनात निर्माण होतो. सोशल मीडियावर सध्या सोया चाप तयार करण्याच्या कथित अस्वच्छ पद्धतीचा एक धक्कादायक व्हिडीओ मोठ्या प्रमाणावर व्हायरल झाला आहे. व्हिडीओ पाहून नेटकऱ्यांमध्ये संतापाची लाट उसळली आहे. व्हिडीओमध्ये काही कामगार सोया चाप तयार करण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या कच्च्या मिश्रणातलोळताना, एकमेकांना ओढताना, पाण्याने अंघोळ करताना दिसत आहे. कामगार त्याठिकाणी रील्स तयार करताना दिसत आहेत. या दृश्यांमुळे अन्न सुरक्षेबाबत आणि उत्पादन प्रक्रियेतील स्वच्छतेबाबत गंभीर प्रश्न उपस्थित झाले आहेत.

मात्र, या व्हिडीओबाबत सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे तो नेमका कुठला, कधी चित्रित करण्यात आला आहे. तसेच त्यातील दावे कितपत खरे आहेत, याची अद्याप कोणत्याही सरकारी यंत्रणेने अधिकृत पुष्टी केलेली नाही.

३७ सेकंदांच्या व्हिडीओने निर्माण केला वाद

सुमारे ३७ सेकंदांच्या व्हायरल क्लिपमध्ये एका कारखान्यासारख्या ठिकाणी सोया चापचे कच्चे मिश्रण जमिनीवर पसरलेले दिसते. त्या मिश्रणात एक अर्धनग्न व्यक्ती झोपलेली असून दुसरा कामगार त्याला हाताने ओढत फिरवतो. तिसरा कामगार त्याच्यावर पाण्याचा फवारा मारत असल्याचेही दिसते. संबंधित व्यक्ती स्वतःच्या अंगावर ते मिश्रण चोळत रील्स बनवत असल्याचे दृश्य व्हिडीओमध्ये आहे. त्याचवेळी इतर काही कामगार मशीनवर नियमित उत्पादनाचे काम करताना दिसतात.

या दृश्यांमुळे सोशल मीडियावर संताप व्यक्त केला जात असून, अनेकांनी अशा प्रकारे तयार झालेला पदार्थ ग्राहकांच्या आरोग्यासाठी गंभीर धोका ठरू शकतो, अशी चिंता व्यक्त केली आहे.

सोशल मीडियावर नोएडाचा दावा

व्हायरल पोस्टमध्ये हा व्हिडीओ उत्तर प्रदेशातील नोएडा सेक्टर-२७ येथील एका सोया चाप उत्पादन केंद्रातील असल्याचा दावा करण्यात आला आहे. हा दावा समोर आल्यानंतर इन्स्टाग्राम, एक्स (पूर्वीचे ट्विटर)सह इतर सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर संतप्त प्रतिक्रिया उमटल्या.

अनेकांनी अन्न सुरक्षा विभागाने संबंधित कारखान्यांची तातडीने तपासणी करून दोषींवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी केली. काहींनी तर “हा व्हिडीओ पाहिल्यानंतर आता सोया चाप खाण्याची इच्छाच राहिली नाही,” अशा प्रतिक्रिया नोंदवल्या.

अधिकृत पुष्टी नाही; चौकशी सुरू

दरम्यान, गौतमबुद्ध नगरचे सहाय्यक आयुक्त (अन्न सुरक्षा) सर्वेश मिश्रा यांनी सांगितले की, व्हायरल व्हिडीओची दखल घेण्यात आली असून प्राथमिक पाहणीत तो नोएडातील असल्याचे स्पष्ट होत नाही. संपूर्ण प्रकरणाची सखोल चौकशी सुरू असून अधिकृत निष्कर्ष आल्यानंतरच सत्य स्पष्ट होईल.

आग्र्यातील जुना व्हिडीओ असल्याचीही चर्चा

काही वृत्तमाध्यमांच्या अहवालांनुसार हा व्हिडीओ नवीन नसून काही वर्षांपूर्वी आग्रा येथे चित्रित करण्यात आला असण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. तोच जुना व्हिडीओ आता नोएडातील असल्याचा दावा करून पुन्हा व्हायरल करण्यात आल्याची चर्चा आहे. मात्र, या दाव्यालाही अद्याप अधिकृत पुष्टी मिळालेली नाही.

त्यामुळे हा व्हिडीओ नेमका नोएडातील आहे की आग्र्यातील जुना व्हिडीओ आहे, हा प्रश्न अद्याप अनुत्तरित आहे.

नेटिझन्समध्ये दोन मतप्रवाह

या व्हिडीओवर सोशल मीडियावर दोन प्रकारच्या प्रतिक्रिया उमटल्या आहेत.

एका गटाने अन्न उत्पादन केंद्रांमधील कथित अस्वच्छतेवर संताप व्यक्त करत कठोर कारवाईची मागणी केली आहे. तर दुसऱ्या गटाने कोणतीही अधिकृत माहिती समोर येण्यापूर्वी निष्कर्ष काढू नयेत, असे आवाहन केले आहे. त्यांचे म्हणणे आहे की सोशल मीडियावर अनेकदा जुने व्हिडीओ नव्या ठिकाणाच्या किंवा नव्या घटनेच्या नावाने व्हायरल केले जातात.

आरोग्यावर होऊ शकतो गंभीर परिणाम

अन्न सुरक्षा तज्ज्ञांच्या मते, जर कोणत्याही अन्नपदार्थाची निर्मिती अस्वच्छ वातावरणात होत असेल तर त्यातून अन्नजन्य संसर्ग, पोटाचे विकार, जंतुसंसर्गयांसह इतर आजारांचा धोका वाढू शकतो. त्यामुळे अन्न उत्पादनाच्या प्रत्येक टप्प्यावर स्वच्छता व गुणवत्ता नियंत्रणाचे नियम काटेकोरपणे पाळणे अत्यावश्यक आहे.

तज्ज्ञांचे असेही मत आहे की, लहान किंवा बेकायदेशीरपणे चालवल्या जाणाऱ्या काही उत्पादन केंद्रांमध्ये स्वच्छतेकडे दुर्लक्ष झाल्यास सोया चाप किंवा मैद्यापासून तयार होणाऱ्या पदार्थांमध्ये दुर्गंधी येणे, बुरशी किंवा किडे पडणे यांसारख्या समस्या उद्भवू शकतात.

तपासणी यंत्रणेवरही प्रश्न

या घटनेनंतर अन्न सुरक्षा विभाग आणि स्थानिक प्रशासनाच्या तपासणी यंत्रणेवरही प्रश्न उपस्थित होत आहेत. नागरिकांचे म्हणणे आहे की अशा कारखान्यांवर नियमितपणे तसेच अचूक तपासण्या झाल्यास निकृष्ट व अस्वच्छ पद्धतीने अन्न उत्पादन करणाऱ्यांवर प्रभावीपणे आळा बसू शकतो.

अधिकृत अहवालानंतरच सत्य स्पष्ट होणार

सध्या अन्न सुरक्षा विभाग आणि संबंधित यंत्रणांकडून व्हायरल व्हिडीओची चौकशी सुरू आहे. हा व्हिडीओ नेमका कुठे व कधी चित्रित करण्यात आला, तसेच त्यातील दावे कितपत सत्य आहेत, याबाबत अद्याप कोणताही अधिकृत निष्कर्ष समोर आलेला नाही.